बाजार समितीतील पदोन्नती चव्हाट्यावर
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : मुंबई एपीएमसीमध्ये उपअभियंता सुदर्शन भोजनकर यांच्या पदोन्नतीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला असून, उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाकडे संचालक मंडळाने दुर्लक्ष केल्याची चर्चा बाजार समितीत चांगलीच रंगली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ‘वरिष्ठतेच्या आधारे ४५ दिवसांच्या आत पदोन्नती करावी’ असा स्पष्ट आदेश दिला होता, मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी संचालक मंडळाने नवीन कमिटी गठित करण्याचा ठराव मंजूर केला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे.
सुदर्शन भोजनकर हे सध्या पदोन्नती देण्यात आलेल्या प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्यापेक्षा तब्बल पाच वर्षे वरिष्ठ आहेत. तरीही भोजनकर यांना वगळून तत्कालीन सभापती व सचिवांनी कनिष्ठ अभियंत्याची प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयाविरोधात भोजनकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे आणि रवींद्र व्ही. घुगे यांच्या खंडपीठाने ११ नोव्हेंबर रोजी भोजनकर यांच्या बाजूने निर्णय देऊन, तत्काळ पदोन्नती देण्याचा आदेश दिला, मात्र आदेशाला एक महिना उलटूनही ते लागू करण्यात आलेले नाही.
डिसेंबर ८ च्या बैठकीत आदेशाची अंमलबजावणी न करता पुन्हा कमिटी गठित करण्याचा निर्णय घेतल्याने, उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची जोरदार चर्चा बाजार समिती आवारात रंगली आहे. सर्वांचे लक्ष आता पुढील कार्यवाही आणि न्यायालय आदेशाचे पालन होणार का, याकडे लागले आहे.