रत्नागिरी-एचपीव्हीचे ३१ टक्के लसीकरण पूर्ण
esakal December 10, 2025 01:45 PM

एचपीव्हीचे ३१ टक्के लसीकरण पूर्ण
आरोग्य विभाग; जनजागृतीची आवश्यकता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्ह्यात महिला आरोग्यासंदर्भात एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यभरात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात १५ वर्षाखालील मुलींसाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) या लसीचे लसीकरण करण्यात येत आहे. कॅन्सरपैकी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा (सर्वाइकल कॅन्सर) प्रतिबंध करण्यासाठी ही लस अत्यंत महत्वाची आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ७ हजार ८९० मुलींना याचे लसीकरण करण्यात आले आहे; मात्र लसीसंदर्भात पालकांचे प्रबोधन करण्याची गरज आता समोर येऊ लागली आहे.
रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाने एचपीव्ही ही लस किशोरवयीन मुलींसाठी उपलब्ध केली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील ९ ते १४ वर्षे या वयोगटातील मुलींना ही लस देण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सध्या सुरू आहे. ही लस किशोरवयीन मुलींना देण्याआधी पालाकांचे संमतीपत्र आवश्यक आहे; मात्र अजूनही या लसीसंदर्भात पालकांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात केवळ ३१ टक्के लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे..
एचपीव्ही अर्थात ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे भारतात दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात येत आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (सर्वाइकल कॅन्सर) यामुळे देशात लाखो स्त्रिया कॅन्सरशी झुंज देत आहेत. या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी एचपीव्ही ही लस आता सहज उपलब्ध होत आहे. जिल्हाआरोग्य विभागाकडून ऑगस्ट महिन्यापासून शाळांमध्ये एचपीव्हीचे लसीकरण केले जात आहे; मात्र या लसीसंदर्भात पालकांमध्ये साशंकता असल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेक शाळांमध्ये पालकांकडून या लसीसंदर्भात संमती मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या संदर्भात आता आरोग्य विभागाकडून विशेष जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

------
चौकट

मागील दोन महिन्यात झालेले लसीकरण ः

तालुका मुली
* मंडणगड १४६
* दापोली ५७८
* खेड १,२३७
* गुहागर ५२४
* चिपळूण ५७२
* संगमेश्वर ७७८
* रत्नागिरी २,०३३
* लांजा ७४४
* राजापूर १,०९८

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.