दुःखात एखाद्याचं सांत्वन करताना म्हणू नयेत ‘या’ गोष्टी; भावना दुखावण्याची असते शक्यता
Marathi December 12, 2025 01:25 PM

प्रत्येकाच्या जीवनात सुख- दुःखाच्या घटना घडत असतात. एखादी दुःखद घटना घडल्यावर आपल्या जवळच्या व्यक्तीचं सांत्वन करायला आपण जातो असतो. मात्र यावेळी नकळत आपल्या तोंडून असे शब्द निघतात, ज्यामुळं त्या व्यक्तीच्या दुःखात आणखीनच भर पडते. जर तुम्हीही अशा एखाद्या व्यक्तीला भेटलात तर काही गोष्टी बोलणं टाळा. कारण या काही गोष्टी आहेत ज्यामुळं सांत्वन होण्याऐवजी भावना दुखावण्याची शक्यता असते.

जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं
अनेकदा एखाद्या व्यक्तीचं सांत्वन करताना आपण ‘जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं’ असं वाक्य बोलून जातो. पण जर एखाद्याने आपली नोकरी गमावली असेल किंवा नातेसंबंधात विश्वासघात झाला असेल तर त्यांच्यासाठी काहीही चांगलं नसतं. अशावेळी तुमच्याकडून ‘जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं’ हे ऐकून त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. त्याऐवजी ‘तुम्ही मी तुझ्यासोबत आहे’ असं बोलून धीर दिला पाहिजे.

सर्व काही ठीक होईल
काळ सर्व गोष्टींवर औषध आहे असं म्हंटलं जातं. पण एखाद्या व्यक्तीला त्याच्या वाईट काळात ‘सर्व काही ठीक होईल’ हे वाक्य बोलू नये. कारण अशा व्यक्तींना वर्तमानाची चिंता असते. त्यामुळं तुम्ही भविष्याबद्दल आशा दाखवून उपयोग नसतो. भविष्याबद्दल बोलण्याऐवजी वर्तमानात त्यांच्यासोबत रहा आणि त्यांना धीर द्या.

रडून काही होणार नाही
आपल्या समाजात, रडणे हे बहुतेकदा कमकुवतपणाचे लक्षण मानलं जातं. मात्र मानसशास्त्र तज्ञांच्या मते, रडणं हा ताण कमी करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीला त्याच्या वाईट काळात रडू नको सांगणं चुकीचं आहे. यामुळं त्या व्यक्तीच्या भावना मनात राहतात आणि जास्त त्रास होतो. याऐवजी त्यांना मोकळं होऊ द्या, त्यांच्याशी बोला. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

परिस्थितीचा विचार करून योग्य शब्द वापरणं हे गरजेचं आहे. कारण एकदा का तोंडातून निघालेले शब्द पुन्हा परत घेता येत नाहीत. अशावेळी त्या व्यक्तीला तुमच्या सल्ल्याची नाही तर आधाराची गरज असते हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.