असीम मुनीर पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेंस फोर्सेज (CDF) बनताच तिथे मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. सध्या पाकिस्तानी तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांची फाइल क्लोज करण्याची तयारी सुरु झाली आहे. मागच्या 24 तासात पाकिस्तानात 5 मोठे निर्णय झाले आहेत. इमरान आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना या बद्दल सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्य आता इमरान खान यांच्या बाबतीत जास्त किचकिच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.
जियो टीवीनुसार, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी पीटीआयनेतृत्वाला आता भरपूर झालं असं स्पष्ट केलय. आम्ही आमचं काम करणार. आमच्याविरुद्ध एकही टिप्पणी ऐकून घेणार नाही असं पाकिस्तानी सैन्याने म्हटलं आहे.
पहिला निर्णय
गुरुवारी पाकिस्तानच्या एका न्यायालयाने आलिमा खान यांच्याविरुद्ध कारवाई केली. आलिमा खान यांनी जामिनासाठी जी रक्कम जमा केली होती, ती कोर्टाने जप्त करण्याचे आदेश दिले. आलिमा खान यांच्याविरुद्ध अनेक प्रकरणात खटला सुरु आहे. आलिमाला शांत करुन टाकणं हा सरकारचा पहिला प्रयत्न आहे. आलिमा खान इमरान खान यांच्याबद्दल सर्वात जास्त एक्टिव आहे.
दुसरा निर्णय
इमरान खान यांचे निकटवर्तीय राहिलेले माजी ISI चीफ फैज हामिद यांना सैन्य न्यायालयाने चार प्रकरणात दोषी ठरवलं. फैज यांना पाकिस्तानी कोर्टाने 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. फैज यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. फैज यांच्या माध्यमातून सत्ताधारी पीएमएल-एन इमरान खान यांच्यावर निशाणा साधत आहे.
तिसरा निर्णय
पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्लाह यांच्यानुसार लवकरच इमरान खान यांना दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात येणार आहे. सरकार यावर विचार करत आहे. इमरान यांना रावळपिंडीच्या कुठल्यातरी तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरु आहे. तिथे पीटीआय कार्यकर्ते पोहोचू शकणार नाहीत.
चौथा निर्णय
पाकिस्तानचे माहिती मंत्री अता तरार यांच्यानुसार, आता कोणालाही इमरान खान यांना भेटण्याची परवानगी देण्यात येणार नाही. इमरान प्रत्येक भेटीत सैन्याविरोधात बोलतात असं तरार म्हणाले. हे बरोबर नाही. इमरान यांना कोणाला भेटू द्यायच नाही हे आम्ही आता ठरवलय.
पाचवा निर्णय
पाकिस्तानच्या पंजाब असेंबलीने इमरान खान यांचा पक्ष पीटीआय विरुद्ध एक प्रस्ताव पास केला आहे. इमरानचा पक्ष शत्रु राज्याचा मोहरा आहे, असं या प्रस्तावत म्हटलं आहे. त्यांच्यावर तात्काळ बंदी घालण्यात येत आहे. पंजाब असेंबलीने तहरीक ए लब्बैकवर प्रतिबंध घातला होता. त्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात या संघटनेवर बंदी आहे.