14 षटकार-9चौकार, Vaibhav Suryavanshi चा यूएई विरुद्ध 171 धावांचा झंझावात, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Tv9 Marathi December 12, 2025 06:45 PM

अंडर 19 टीम इंडियाचा वैभव सूर्यवंशी याला रोखणं प्रतिस्पर्धी संघांसाठी दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. वैभव सूर्यवंशी सातत्याने अर्धशतक आणि शतकी खेळी करत गोलंदाजांची धुलाई करतोय. वैभवने हाच तडाखा अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतही कायम ठेवत स्फोटक सुरुवात केली आहे. वैभवने या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी केली. वैभवने यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती विरुद्ध 171 धावांची खेळी साकारली. वैभवच्या यूथ वनडे क्रिकेट कारकीर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. वैभवने यासह मानाच्या पंगतीत स्थान मिळवलंय.

वैभवचा शतकी झंझावात

वैभवने या सामन्यात सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. वैभवने पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं. वैभवने अवघ्या 56 बॉलमध्ये शतक झळकावलं. वैभवने त्यानंतर अवघ्या 28 बॉलमध्ये 50 धावा करत दीडशतक पूर्ण केलं. त्यामुळे वैभवला द्विशतक करण्याची सुवर्णसंधी होती. वैभवने द्विशतकाच्या दिशेने जाताना मैदानात चौफेर फटेकबाजी केली. मात्र द्विशतकाआधीच वैभवच्या खेळीचा शेवट झाला.

वैभवची विक्रमी खेळी

उद्दीश सुरी याने वैभवच्या खेळीला ब्रेक लावला. वैभव 171 धावांवर आऊट झाला. वैभवने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. वैभवची याआधी यूथ वनडे क्रिकेटमधील 143 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. वैभवने याच वर्षी इंग्लंड विरुद्ध ही खेळी केली होती. मात्र वैभवने अवघ्या काही महिन्यांतच स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक केला. आता वैभवचं आगामी सामन्यांमध्ये द्विशतकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.

वैभवसमोर सर्वच गोलंदाज ढेर

वैभवने त्याच्या या विक्रमी खेळीत मैदानात चौफेर आणि मनसोक्त फटकेबाजी केली. वैभवने यूएईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. वैभवने 171 पैकी 120 धावा या फक्त 23 बॉलमध्ये एका जागेवरुन केल्या. वैभवने 9 चौकार (36 धावा) आणि 14 षटकारांसह (84 धावा) एकूण 120 धावा केल्या. वैभवने 180 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. वैभवने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला.

वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड

वैभव यूथ वनडेतील एका सामन्यात 10 पेक्षा सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच वैभव 150 धावा करणारा सातवा भारतीय फलंदाज ठरला.

वैभवचा धुमधडाका

– 171 runs.
– 95 balls.
– 9 fours.
– 14 Sixes.

ONE & ONLY VAIBHAV SURYAVANSHI IN U-19 ASIA CUP 🇮🇳 HE IS GOING TO BE THE SUPER HERO. pic.twitter.com/iEuFgeMedx

— Johns. (@CricCrazyJohns)

आयपीएलपासून धमाका सुरु

दरम्यान वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या 18 व्या मोसमापासून चर्चेत आला. वैभव सर्वात कमी वयात आयपीएल पदार्पण करणारा खेळाडू ठरला. वैभवने अवघ्या 14 व्या वर्षी पदार्पण केलं. तसेच राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना वैभवने आयपीएल कारकीर्दीतील आपल्या पहिल्याच पर्वात ऐतिहासिक कामगिरी केली. वैभव या स्पर्धेच्या इतिहासात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

वैभवला या 18 व्या हंगामातील 7 सामन्यांमध्ये संधी मिळाली. वैभवने या 7 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह एकूण 252 धावा केल्या होत्या. वैभवचा तेव्हापासून सर्वच फॉर्मेटमध्ये धमाका सुरुच आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.