Satya Nadella : मायक्रोसॉफ्टची भारतात तब्बल १७.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक; सत्या नाडेला यांचा मोठा निर्णय, लाखोंना देणार 'एआय'चं ट्रेनिंग!
esakal December 12, 2025 11:45 PM

बंगळूर : मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला (Satya Nadella) यांनी गुरुवारी भारतासाठी कंपनीची नवी आणि आतापर्यंतची सर्वांत मोठी गुंतवणूक जाहीर केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्लाउड पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी मायक्रोसॉफ्ट भारतात तब्बल १७.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही मायक्रोसॉफ्टची आशियातील सर्वांत मोठी गुंतवणूक ठरणार आहे.

एका विशेष कार्यक्रमात बोलताना नाडेला म्हणाले की, भारतातील एआय परिसंस्थेला बळकटी देणे आणि लाखो भारतीयांना एआय-केंद्रित कौशल्य प्रशिक्षण देणे हा कंपनीचा प्रमुख उद्देश आहे. भारतातील मायक्रोसॉफ्टची क्लाउड क्षमता वेगाने वाढत आहे. आम्ही ‘अझ्युर’द्वारे जागतिक संगणक पायाभूत सुविधा उभारल्या असून, जगभरात ७० पेक्षा जास्त डेटा सेंटर क्षेत्रे आहेत.

भारतात मध्य भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारतासह जिओसोबतची आमची भागीदारीही विस्तारत आहे. यावेळी २०२६ पर्यंत दक्षिण-मध्य भारतात मायक्रोसॉफ्टचे नवीन डेटा सेंटर कार्यान्वित होणार असून, ते १०० टक्के शाश्वत ऊर्जा प्रणालीवर आधारित असेल, असेही नाडेला यांनी स्पष्ट केले.

VIDEO : 'कायदा सर्वांसाठी समान, मग तुम्ही का मोडता? चुकीचा यू-टर्न घेतल्यावर महिलेने भरचौकात पोलिसांनाच सुनावलं; प्रकरण गेलं थेट ठाण्यात... डिजिटल सार्वभौमत्व व सायबर सुरक्षा

एआय तैनातीच्या वेगाने वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नाडेला यांनी डिजिटल सार्वभौमत्व व सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘सार्वभौमत्वाला सुरक्षेशी जोडूनच पाहावे लागेल. जगभरातील अब्जावधी सायबर सिग्नल्सची प्रक्रिया केल्याशिवाय सुरक्षित पायाभूत सुविधा उभारता येत नाही,’ असे ते म्हणाले.

पंतप्रधानांसोबत चर्चा

नाडेला यांनी सांगितले की, मी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या गुंतवणुकीबाबत चर्चा केली. समाज, अर्थव्यवस्था आणि विकासासाठी ही गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरेल, असा पंतप्रधानांचा उत्साहही त्यांनी व्यक्त केला. ‘भारताला सक्षम करण्याचे आमचे ध्येय स्पष्ट आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक संस्थेला अधिक साध्य करण्याची शक्ती देणे. चला, आपण मिळून भविष्यासाठी उभारणी करूया’, असे ते म्हणाले.

VIDEO : याला म्हणतात धोनीचा कट्टर फॅन! पठ्ठ्यानं CSK-RCB सामन्यांसाठी वधू'समोर ठेवली अनोखी अट; मजेदार 'करार' वाचून तुम्हीही खळखळून हसाल एआय प्रशिक्षणाला मोठी चालना

कौशल्य विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत मायक्रोसॉफ्टने आता २० दशलक्ष (२ कोटी) भारतीयांना एआय कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचा संकल्प केला आहे. ई-श्रमसारख्या सरकारी उपक्रमांद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना एआय तंत्रज्ञानाचा लाभ मिळू शकतो. भारताची वाढती तांत्रिक क्षमता अधोरेखित करत नाडेला म्हणाले, २०३० पर्यंत भारत गिटहबवरील जगातील क्रमांक एक विकासक समुदाय बनेल, अशी अपेक्षा आहे. गिटहब हे जगातील सर्वात मोठे सॉफ्टवेअर कोड सहयोग प्लॅटफॉर्म असून, भारतीयांचा वाढता सहभाग मायक्रोसॉफ्टसाठीही महत्त्वाचा ठरत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.