कुर्डुवाडी : अंगठी घेण्याचा बहाणा करत चोरट्याने हातचलाखी करून ज्वेलर्सच्या दुकानातून सुमारे अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या रिंगा लांबवल्या. ही घटना लऊळ (ता. माढा) येथील दरलिंग ज्वेलर्स या दुकानात ता. ८ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
दुकानाचे मालक मंगेश गाडे (रा. घाटणे, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात उशिराने फिर्याद दिली आहे. सदर वेळी फिर्यादी व त्याचे मामा दुकानात असताना ३५ ते ४० वयोगटातील एक व्यक्ती लहान सोन्याची अंगठी आहे का? असे विचारत आला. फिर्यादीने तिजोरी उघडून अंगठ्या दाखवल्या.
परंतु, वजन जास्त आहे, असे कारण सांगून अंगठी न घेता तो नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून निघून गेला. दरम्यान, त्याने हातचलाखी करत दुकानातील ३५ ग्रॅम वजनाची २ लाख ४५ हजार रुपये किमतीची कानातील सोन्याच्या रिंगा असलेली पुडी लंपास केली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू आहे.