पुणे - पुण्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, आपल्या वाहनाला आवडता क्रमांक मिळावा म्हणून पुणेकरांनी शासनाने ठरविलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम देऊन आपला आवडता क्रमांक घेतला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २५ दरम्यान तब्बल ४८ हजार ३०३ वाहनधारकांनी ‘चॉइस क्रमांक’ घेतला असून त्यासाठी त्यांनी ७१ कोटींहून अधिक रक्कम मोजली आहे.
या कालावधीत चारचाकीच्या ‘७’ क्रमाकांसाठी सर्वाधिक किमतीची बोली लागली होती. ‘७’ या क्रमांकाचे शुल्क ७० हजार रुपये असताना हौसेसाठी एका वाहनधारकाने ‘७’ या क्रमांकासाठी तब्बल ७ लाख ७७ हजार ७७७ रुपये मोजले. ही आता पर्यंतची सर्वांत जास्त बोली ठरली आहे.
वाहनासाठी विशिष्ट ‘चॉइस नंबर’ किंवा ‘व्हीआयपी नंबर’ मिळविण्याची क्रेझ पुणेकरांमध्ये किती आहे, हे या आकड्यांकडे पाहून कळते. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीवरून जानेवारी ते नोव्हेंबर २५ या ११ महिन्यांच्या कालावधीत पुणे आरटीओने केवळ चॉइस क्रमांकांच्या माध्यमातून ७१ कोटी ५३ लाख ४० हजार ९५१ रुपयांचे विक्रमी उत्पन्न प्राप्त केले आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत वाहने कमी असतानाही, ‘आरटीओ’च्या महसुलात तब्बल १८ कोटींहून अधिक रुपयांची भरघोस वाढ झाली आहे.
वाढलेला महसूल
चालू वर्षातील उत्पन्न (जानेवारी ते नोव्हेंबर २०२५) - ७१.५३ कोटी रुपये
मागील वर्षातील उत्पन्न (जानेवारी ते नोव्हेंबर २०२४) - ५२.८७ कोटी रुपये
‘आरटीओ’च्या महसुलात मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे - १८ कोटी ६५ लाख रुपयांची वाढ
चारचाकीच्या १ क्रमाकांसाठी ३ लाख रुपये शुल्क आहे.
‘१’ क्रमांकांची विक्री ३ लाख रुपयालाच झाली.
‘७’ क्रमांक मिळविण्यासाठी मात्र ७ लाख ७७ हजार ७७७ रुपये मोजावे लागले.
जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान चॉइस क्रमांकाच्या विक्रीतून ‘आरटीओ’ला ७१ कोaटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला. ७, ९ या क्रमांकाला पुण्यात सर्वांत जास्त मागणी आहे. यंदाच्या वर्षी ‘७ ’ क्रमाकांसाठी सर्वांत जास्त बोली लागली होती.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.
वाहनसंख्येत घट, मात्र महसुलात वाढ
४८,३०३ - जानेवारी ते नोव्हेंबर २०२५
४८,७९८ - जानेवारी ते नोव्हेंबर २०२४
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ४९५ वाहनांची संख्या घटली आहे. ज्यांनी चॉइस क्रमांक घेतलेले नाही. तरीदेखील महसूल वाढला आहे.