जुन्या वादाच्या रागातून डोंबिवलीतील एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव परिसरात ही घटना घडली. नरेंद्र उर्फ काल्या भालचंद्र जाधव (२५) या तरुणाचा कोयता, चाकू आणि लोखंडी रॉड यांसारख्या धारदार शस्त्रांनी तब्बल ४० हून अधिक वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तत्परतेने तीन आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?प्राथमिक माहितीनुसार मृत नरेंद्र जाधव आणि अटक केलेले आरोपी आकाश गौरीशंकर बिराजदार, दिवाकर महेशचंद्र गुप्ता आणि आलिफ शहादाब खान यांच्यात काही जुने वाद होते. याच वादाचा राग मनात धरून या तिघांनी एकत्र येऊन नरेंद्र जाधव याला संपवण्याचा कट रचला. रविवार रात्री ११:३० च्या सुमारास आयरेगाव परिसरात नरेंद्र जाधवला आरोपींनी अडवले. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत धमकावले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे तू इकडे का आलास, आता तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. तुला इथेच संपवणार अशा धमक्या दिल्या.
या धमक्या दिल्यानंतर आरोपींनी नरेंद्र जाधव याच्यावर एकाच वेळी हल्ला चढवला. त्यांनी कोयता, चाकू आणि लोखंडी रॉडचा वापर केला. हल्लेखोरांनी नरेंद्र यांच्या शरीरावर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. त्यांच्या डोके, मान, गळा, छाती, पोट, पाठ तसेच हात-पायांवर मिळून 40 पेक्षा जास्त प्राणघातक वार करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव आणि गंभीर जखमांमुळे नरेंद्र जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
नरेंद्र जाधव यांच्यावरील हा भयानक हल्ला थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा मित्र शुभम राजेश पांडे यांनी केला. मात्र, हल्लेखोर इतके क्रूर झाले होते की त्यांनी शुभम पांडे यांनाही सोडले नाही. आरोपी आकाश बिराजदार याने शुभम पांडे याला तू आमच्यामध्ये पडू नकोस, तू मध्ये पडलास तर तुलाही संपवू, अशी धमकी दिली. यावेळी आकाशने चाकूने शुभमच्या डोक्यावर वार केला, तर इतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात शुभम पांडे जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
आरोपींना अटकदरम्यान या घटनेची माहिती मिळताच डोंबिवली रामनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हत्येचे स्वरूप आणि परिसरात पसरलेला तणाव पाहता पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. पोलीस पथकाने घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. गुन्हा दाखल झाल्याच्या अवघ्या १२ तासांत पोलिसांनी तिन्ही मुख्य आरोपींना अटक केली. आकाश गौरीशंकर बिराजदार, दिवाकर महेशचंद्र गुप्ता आणि आलिफ शहादाब खान अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.
रामनगर पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ नुसार कलम १०३ (हत्या), १०९ (षडयंत्र), ११५(२) (गुन्हेगारी उद्देश), ३५२, ३५१(२), ३(५) यांसारख्या गंभीर कलमांखाली तसेच भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रे चाकू, कोयता आणि लोखंडी रॉड जप्त केले. तसेच आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. जुन्या वादाचे नेमके स्वरूप काय होते, या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत रामनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.