कोल्हापूर / इचलकरंजी / मुंबई : गेली पाच वर्षे लांबलेल्या, दहा वर्षांपूर्वी मतदान झालेल्या कोल्हापूर महापालिकेसाठी तर पहिल्यांदाच इचलकरंजी महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणूक जाहीर केल्याने गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या राजकीय क्षेत्रातील हालचालीही गतिमान झाल्या आहेत. इचलकरंजी पूर्वी पालिका होती. महापालिका म्हणून येथे पहिल्यांदाच मतदान होणार आहे.
Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाककोल्हापूर महापालिकेतही पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार मतदान होणार आहे. दोन्ही ठिकाणी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे.
राजकीय आघाडीवर धामधूम सुरूनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय आघाडीवर एकच धामधूम सुरू झाली आहे. राजकीय पक्षातील जागा वाटप, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होत आहे.
तर महाविकास आघाडीतीलही समितीकडून स्थानिक नेत्यांना मित्र पक्षांसोबत झालेल्या चर्चेचा अहवाल देणे, काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती अशा साऱ्याच बाबींना सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुकांना त्यांच्या मनाप्रमाणे उमेदवारी न मिळाल्यास पक्षाला रामराम, नाराजीनाट्य या प्रकारांना सुरुवात होणार आहे.
यामुळे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंतच्या दोन आठवड्यांत शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ईर्ष्ये होणार लढती इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी इर्षेने लढती होण्याची चिन्हे आहेत. त्यातही महायुती विरुध्द महाविकास आघाडी यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये घटक पक्षांच्या जागा वाटपाचा घोळ अद्याप सुटलेला नाही. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविल्यास मात्र वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी अद्याप एकसंध दिसत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बंडखोरीची भिती आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथील सह्याद्री अतिथिगृहात पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी हे यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेची अधिसूचना उद्या (ता. १६) तर उर्वरित महापालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी (ता. १८) जाहीर होणार आहे.
मुंबई महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये एकसदस्यीय प्रभागरचना असल्याने या ठिकाणी मतदारांना काही ठिकाणी तीन, चार किंवा पाच मते द्यावी लागणार आहेत. आज जाहीर झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांपैकी २७ महापालिकांनी मुदत संपलेली आहे, तर जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मित महानगरपालिका आहेत.
मुदत संपलेल्या या महापालिकांपैकी पाच महापालिकांनी मुदत २०२० मध्ये संपलेली आहे, तर १८ महापालिकांची मुदत २०२२ मध्ये संपलेली आहे. चार महापालिकांची मुदत २०२३ मध्ये संपलेली आहे.
सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत असून अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर करणार आहेत.
या महापालिका निवडणुकीत दोन हजार ८६९ जागांसाठी मतदान होणार असून त्यात १४४२ महिला नगरसेवक असणार आहेत. त्याचबरोबर ३४१ अनुसूचित जातीचे नगरसेवक, ७७ अनुसूचित जमातीचे आणि ७५९ नगरसेवक ओबीसी असणार आहेत. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करायच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी राहणार नसल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
अर्ज ‘ऑफलाइन’चस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली असली तरी विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत.
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा चालू शकणार आहे. निवडून आल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. तसे न करणाऱ्याची निवड पूर्वलक्ष्यी प्रभावाने रद्द होईल, असे आयोगाने स्पष्ट केले.
संभाव्य दुबार मतदारकेंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणार आहेत. निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै २०२५ या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत.
या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नसली, तरी त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज (सोमवारी) प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी २० डिसेंबरला, तर मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या २७ डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जातील.
मतदारांकडून हमीपत्रमहानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन चांदण्यांचे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले.
घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी केली आणि त्यांच्याकडून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.
बहुसदस्यीय प्रभागाची पहिलीच निवडणूक२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसदस्यीय प्रभाग रचना होती. २०२० मध्ये मुदत संपल्यानंतर प्रथम एकसदस्यीय, नंतर तीनसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. त्या साऱ्या रद्द करून चारसदस्यीय प्रभाग रचना निश्चित झाली. पूर्वीचा अनुभव पाहता निवडणूक कार्यक्रम घोषित होईपर्यंत कुणीच विश्वास ठेवत नव्हते. आज निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने ती अनिश्चितता दूर झाली. त्यामुळे चारसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे नवीन सभागृह जानेवारीमध्ये अस्तित्वात येणार आहे. त्यानंतर महिनाअखेरपर्यंत महापौरही निश्चित होऊ शकतो.
दृष्टिक्षेपातकोल्हापूर महापालिकेची गत निवडणूक.... २०१५
यंदाची प्रभाग संख्या.......................... २०
चार सदस्यांचे प्रभाग.......................... १९
पाच सदस्यांचा प्रभाग .......................... १
मतदार संख्या............ ४ लाख ४९ हजार ७११
सर्वाधिक मतदार असलेला.......... प्रभाग क्र. १२
सर्वांत कमी मतदार असलेला.......... प्रभाग क्र. ३
पाचसदस्यीय प्रभाग क्र. २० ची मतदार संख्या ३२ हजार ६१५ इचलकरंजी महापालिकेची पहिलीच निवडणूक
प्रभाग संख्या................................ १६
चारसदस्यीय प्रभाग .......................... १५
पाचसदस्यीय प्रभाग ........................... १
एकूण मतदार............. २ लाख ४९ हजार १२९
सर्वांत कमी मतदार असणारा ...... प्रभाग क्र. - ४
सर्वांत जास्त मतदार असणारा.... प्रभाग क्र. - १६
पाचसदस्यीय प्रभाग क्र. १६ ची मतदार संख्या २२ हजार ०९८
निवडणूक कार्यक्रमउमेदवारी अर्ज स्वीकारणे 23 ते 30 डिसेंबर 2025
अर्जाची छाननी 31 डिसेंबर 2025
अर्ज माघारीची अंतिम मुदत 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप 3 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026
मतदान 15 जानेवारी 2026
मतमोजणी आणि निकाल 16 जानेवारी 2026