तळवडे-निगडी रस्ता धोकादायक
esakal December 17, 2025 08:45 AM

निगडी, ता. १६ ः तळवडे-निगडी रस्ता हा प्रवासासाठी धोकादायक होत आहे. मार्गावरील वाढत्या अपघातांमुळे रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. गतिरोधकावर पांढरे पट्टे नाहीत. काही जागेवर विजेचे खांब नाहीत अंधार असतो. अवजड वाहतूक, वेगमर्यादा उल्लंघनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे.
तळवडे- त्रिवेणीनगर या प्रमुख मार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवडमधील हा मार्ग देहू-आळंदी, चाकण औद्योगिक वसाहत तसेच निगडी या महत्त्वाच्या भागांना जोडणारा असल्याने अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सकाळी व संध्याकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. तळवडे गाव चौक, त्रिवेणीनगर चौक, जोतिबानगर चौक हे ‘ब्लॅक स्पॉट’ बनले असून, या ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.
रात्री नऊ नंतरच अवजड वाहनांना प्रवेश द्यायचा नियम असतानाही काही वाहनचालक नियम धाब्यावर बसवून दिवसा मोठ्या गाड्या चालवताना दिसतात. शिवाय पीएमपीएमएल बसचालकांकडूनही बेफिकिरीने बस चालवली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वेगमर्यादा न पाळल्याने निरपराध नागरिकांचे जीव जात आहेत, ही चिंताजनक बाब आहे.


आवश्यक उपाययोजना
-तळवडे–त्रिवेणीनगर मार्गावरील गतिरोधकांचे स्वतंत्र ऑडिट करावे.
-योग्य जागी आणि योग्य उंचीचे नसलेल्या स्पीड ब्रेकरची पुनर्बांधणी करावी.
-मुख्य रस्त्यावर अतिप्रमाणात दिलेले रस्ताछेद (Crossings) कमी करावेत.
-आवश्यक ठिकाणी सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून द्यावेत.
-झेब्रा क्रॉसिंग आणि वाहतूक नियमनासाठी पोलिसांचे प्रमाण वाढवावे.
-अवजड वाहन चालकांना नियमितपणे वाहतूक शिस्तीचे प्रशिक्षण दिले जावे.
-वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी.
-पीएमपीएमएल बसचालकांवर निरीक्षण वाढवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी.

दररोज अपघातांच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. रस्त्यावरील वेग नियंत्रण, अवजड वाहने यांचे नियमन आणि पोलिसांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. अन्यथा ही परिस्थिती अधिक गंभीर बनेल.
-राजेश जाधव, रुपीनगर

तळवडे-त्रिवेणीनगर मार्गावरील ब्लॅक स्पॉट्स तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. अवजड वाहनांच्या अनियमित ये-जा आणि पीएमपीएमएल बसचा बेफिकीर वेग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने त्वरित कडक पावले उचलावीत.
-सचिन कुडापने, तळवडे

वाहतूक सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनला पत्र दिले आहे. प्रत्येक चौकात कर्मचारी नियुक्त केले आहेत. मुळात या रस्त्यावर वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सतत रहदारी खूप आहे. पण आमच्या पातळीवर सर्वोतोपरी उपाय सुरू आहे.
-रामचंद्र घाडगे, वाहतूक वरीष्ठ पोलिस निरीक्षक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.