घोडेगाव, ता. १७ : आदिवासी विकास विभाग अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी घोडेगाव प्रकल्पातून १५८ मुले व १६० मुली असे एकूण ३१८ खेळाडू नऊ एसटी बसेसद्वारे शेंडेगाव (ता. शहापूर) येथे बुधवारी (ता. १७) रवाना झाले. या स्पर्धेत एकूण ६ प्रकल्पातून २००० खेळाडू विविध क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत.
विभागीय क्रीडा स्पर्धेची तयारी म्हणून घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत मुलींचे, तर तेरुंगण (ता. आंबेगाव) या ठिकाणी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत मुलांचे ८ दिवसांचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथील प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत नाईकडे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पांचाळ, सविता गळगटे, नम्रता चाळके, सुरेश दुरगुडे, बाळासो.शिंदे, अधिक्षक दिनेश पाटील आदी उपस्थित होते.