सीरियामधील इस्लामिक स्टेट (IS) विरोधात अमेरिकेने पुन्हा एकदा मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. पल्मायरा भागात झालेल्या घातक हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर याचा निषेध करत पेंटागॉनने कठोर प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमेरिकन सैन्याने ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ सुरू केला आहे. ISIS चं नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्यांचं नामोनिशाण संपवणं हाच या ऑपरेशनचा उद्देश असल्याचं समजतं.
पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, 13 डिसेंबर रोजी सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक नागरिक ठार झाला, तर तीन सैनिक गंभीर जखमी झाले. त्याच हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही लष्करी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमेरिका आपल्या नागरिकांवर आणि सैनिकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही आणि जगात जर कोणीही अमेरिकन लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर पाठलाग करून त्यांना संपवले जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
सीरियात 70 हून अधिक ठिकाणं उद्ध्वस्त
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनअंतर्गत सीरियामध्ये ISIS शी निगडीत जवळपास 70 ठिकाणांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे, शस्त्रास्त्रं साठवणूक केंद्र आणि प्रशिक्षण तळांचा समावेश होता. पुढील परिस्थितीनुसार येत्या काही दिवसांत आणखी लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याचे संकेत पेंटागॉनने दिले.
कसा केला हवाई हल्ला ?
या कारवाईत अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी त्यांच्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले. या एअर स्ट्राईकसाठी या हल्ल्यांमध्ये एफ-15 ईगल फाटर जेट, ए-10 थंडरबोल्ट अटॅक एअरक्राफट्स, AH-64 अपाचे हेलिकॉप्टर आणि HIMARS रॉकेट सिस्टमचा वापर करण्यात आला. जॉर्डनच्या एफ-16 लढाऊ विमानांनीही या कारवाईत भाग घेतला.
ट्रम्प यांचा दहशतवाद्यांना थेट इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही लष्करी कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ” या हल्ल्यांमध्ये ISISच्या मजबूत गडांना लक् करत ते हादरवण्यात आले आहेत ” असे ते म्हणाले. अमेरिकेवर हल्ला करण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक उत्तर मिळेल, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला.