कोल्हापूर : एक माजी महापौर, एक माजी उपमहापौर यांच्यासह ढिगभर माजी नगरसेवक अशा तगड्या इच्छुकांमुळे प्रभाग क्रमांक पाचमध्ये चुरस वाढणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व माजी आमदार मालोजीराजे यांचा मोठा प्रभाव असलेल्या या प्रभागात काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
बहुंताशी इच्छुक हे आर्थिक, सामाजिक आणि संपर्काच्या पातळीवर तगडे असल्याने उमेदवारी देतानाही नेत्यांची कसोटी लागणार आहे.
- निवास चौगले
पूर्वीचा लाईन बाजार, पोलिस लाईन, रमणमळा व नागाळा पार्क या चार प्रभागांचा मिळून हा एक प्रभाग झाला आहे. २०१५ च्या निवडणुकीत या चारही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. उच्चभ्रू, मध्यमवर्गीयांसह मुस्लिम व दलित मतदारांची मोठी संख्या या प्रभागात आहे.
लाईन बाजार व पोलिस लाईन परिसरात पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. याच दोन प्रभागांत मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. कसबा बावड्यातील ठोंबरे गल्लीच्या दक्षिण बाजूपासून ते भगवा चौक, मराठा कॉलनी, बावडा ते कदमवाडी रस्त्याच्या दक्षिण बाजूकडील सर्व कॉलन्यांचा परिसर या प्रभागात येतो.
या दोन्ही प्रभागांवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. पण, त्याचवेळी काँग्रेसकडून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यात एक माजी महापौर, एक माजी उपमहापौर दोन माजी नगरसेवक आणि गेले चार-पाच वर्षे निवडणुकीची तयारी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भाजपकडूनही दोन माजी नगरसेवकांसह २०१५ ची निवडणूक लढवलेल्यांची गर्दी आहे.
अशीच स्थिती रमणमळा व नागाळा पार्क परिसरात आहे. यातील रमणमळा व न्यू पॅलेस परिसरात माजी आमदार मालोजीराजे यांचा मोठा दबदबा आहे. पण, हा परिसर उच्चभ्रू व मध्यमवर्गीयांबरोबरच फ्लॅट संस्कृतीत राहणाऱ्यांचा आहे. रमणमळा परिसरात दलित मतदारांची संख्या मोठी आहे.
जावडेकर संकुल, न्यू पॅलेस, महावीर महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या भागात बाहेरून स्थायिक झालेल्यांची मोठी संख्या आहे. हा सर्व वर्ग महापालिकेच्या राजकारणाशी फारसा संबंध नसलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव असलेल्यांना मतदानाला बाहेर काढणे हेच उमेदवारांसमोरचे मोठे आव्हान असेल.
महापालिकेच्या सभागृहात पूर्वी प्रतिनिधीत्व केलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांचाही प्रभाव आहे. प्रभागातील दोन जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी, तर प्रत्येकी एक जागा खुली व ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
महिलांसाठी दोन जागा असल्याने ज्यांनी स्वतः लढण्याची तयारी केली होती, त्यांच्याकडून सौभाग्यवतींना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीची ताकद तुलनेने कमी आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर उमेदवार शोधावे लागतील, अशी स्थिती आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला किती जागा वाट्याला येणार, त्यावर उमेदवार कोण हे ठरेल. ऐनवेळी भाजप किंवा शिवसेना शिंदे पक्षांकडील एखाद्या तगड्या उमेदवाराला त्या पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास अशा उमेदवाराला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ‘घड्याळा’वर रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
दृष्टिक्षेपात लोकसंख्याएकूण कसंख्या = २८, ५०३
अनुसूचित जाती लोकसंख्या = २९७०
अनुसूचित जमाती लोकसंख्या = ३०५
पुरुष मतदार= ११, ७८१
महिला मतदार = ११, ७७१
एकूण मतदार = २४,०५९
प्रभागाची व्याप्तीभगवा चौक, रेणुकानगर, त्र्यंबोली नगर, पोलिस लाईन, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, लाईन बाजार गावठाण, झूम प्रकल्प, हिम्मतबहाद्दूर परिसर, पितळी गणपती, रमणमळा, न्यू पॅलेस, आरटीओ कार्यालय, जिल्हा परिषद, नागाळा पार्क
विकासाचे मुद्देलाईन बाजारमधील कचरा प्रकल्प हलवणे
कचरा प्रकल्पाला आग लागल्याने होणारे प्रदूषण
नव्या कॉलनीत रस्ते, गटारीचा अभाव
रमणमळा परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
नागाळा पार्क, पोलिस लाईन परिसरात कचरा उठाव समस्या
आरक्षण असेअ - ओबीसी
ब - खुला महिला
क - खुला महिला
ड - खुला
खुला
काँग्रेस- माजी उपमहापौर अर्जुन माने, राजाराम गायकवाड, संदीप उर्फ पप्पू सरनाईक, रवी जानकर
भाजप- माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, धीरज राजेंद्र पाटील, अनिल आदिक, अद्वैत सरनोबत, नरेश तुळशीकर,
शिवसेना शिंदे गट - आदर्श सुनील जाधव, समीर सदाशिव यवलुजे, जय लाड
खुला महिला (दोन जागा)
काँग्रेस - माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेविका माधुरी लाड, श्वेता निवास जाधव, सुप्रिया योगेश निकम, रूकैय्या ताहिर शेख, वैशाली बंडा जाधव, सरोज संदीप उर्फ पप्पू सरनाईक
शिवसेना ठाकरे गट - माधवी सावंत-लोणारे
भाजप- माजी नगरसेविका पल्लवी नीलेश देसाई, कविता किशोर लाड
राष्ट्रवादी शरद पवार गट - शिवानी बाजीराव खाडे
ओबीसी
काँग्रेस - विनायक कारंडे, श्रीकांत चव्हाण, प्रशांत माळी
शिवसेना ठाकरे गट - माजी नगरसेवक सुनील मोदी
भाजप-अजिंक्य अशोक जाधव
राष्ट्रवादी शरद पवार गट - राम बदाले