फडणवीसांच्या त्या विधानावर मुनगंटीवार स्पष्टच बोलले, म्हणाले मला ताकदीची गरज नाही, मी…
Tv9 Marathi December 22, 2025 08:45 PM

रविवारी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला, या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र जरी असं असलं तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळवता आलं नाही, यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांना ताकद देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता मुनगंटीवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. मला ताकदीची गरज नाही, मी ताकद नसतानाही काम करतो असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच महापालिका निवडणुकीनंतर राज्यभरात दौरा करणार असल्याची घोषणा देखील यावेळी मुनगंटीवार यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?  

महापालिका निवडणुका झाल्यावर मी राज्यभर दौरा करणार असून, यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. भाजपमध्ये कुणी नाराज राहू शकत नाही. त्यामुळे या दौऱ्यात सर्वांच्या भेटी घेणार आहे. अशी माहिती यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार यांना ताकद देऊ असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं, यावर पलटवार करताना मला ताकदीची गरज नाही. ताकद नसतानाही मी कामे करतो, अनेक कामे मी केलेली आहेत. असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

मंत्रीपद हा विषय नव्हता, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे चारीही जिल्हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी नेहमी उभे राहिले आहेत.  या चार जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची एक भावना आहे, इतके वर्ष कष्ट केल्यावरही विकासाचा जेवढा वेग पाहिजे होता तेवढा दिसून येत नाहीये, छोट्या छोट्या गोष्टीचे निर्णय देखील वेगाने होताना दिसत नाही, त्याच्या परिणाम हा निवडणुकीमध्ये दिसून आला आहे. जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण होऊ नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशा लोकांना तुम्ही पक्षात प्रवेश देता ज्यांनी आज सर संघचालकाचा कार्यक्रम रद्द व्हावा या मागणीसाठी पत्र दिलं होतं, असा घणाघातही यावेळी मुनगंटीवार यांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.