Christmas Market Pune: नाताळसाठी बाजारपेठ सजली; सजावटीचे साहित्य, आकर्षक भेटवस्तू खरेदीसाठी उत्साह
esakal December 23, 2025 03:45 AM

राधिका वळसे पाटील

पुणे : चर्च, मॉल, हॉटेल्स आणि कॅफेबाहेर झगमगणारी विद्युत रोषणाई, केक-पेस्ट्रींनी सजलेल्या बेकऱ्या आणि चौकाचौकांत सांताक्लॉजचे मुखवटे आणि टोप्या विकणारे फेरीवाले यामुळे शहरातील वातावरण नाताळमय झाले आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत नवनवीन, आकर्षक सजावटीच्या वस्तू दाखल झाल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.

डिसेंबर सुरू होताच चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच नाताळाचे वेध लागतात. याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सजावटीसाठी विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. संगीतमय सांता, पॅराशूट सांता, सांताचे पोशाख, फोल्डिंग साहित्य, विविध रंगांचे स्नो, चेरी ख्रिसमस ट्री, आकर्षक मेणबत्त्या, रंगीबेरंगी बॉल्स, तारे, चांदण्या, सांताक्लॉजच्या प्रतिकृती, घंटा, वॉल हँगिंग, स्नोमॅन, कृत्रिम फुलांच्या वेली, झाडे तसेच येशू ख्रिस्तांची कथा सांगणारे देखावे बाजारात दाखल झाले आहेत. यासोबतच विद्युत रोषणाईचे साहित्य, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, आकर्षक पॅकिंगमधील चॉकलेट आणि रंगीबेरंगी मेणबत्त्यांनी दुकाने सजली आहेत.

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

सजावटीचे साहित्य साधारण चारशे ते १,३०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून, येशू ख्रिस्तांची कथा मांडणारे देखावे पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत. सांताच्या प्रतिकृती, मोजे, मुखवटे, खेळणी, बाहुल्या, ख्रिसमस ट्री, मेणबत्त्या, चॉकलेट, भेटवस्तू व कार्डस् ३० रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मोठ्या आकारातील सांताक्लॉजच्या प्रतिकृतींची किंमत ८५० ते १,३०० रुपयांदरम्यान आहे.

प्लम केकला मागणी

नाताळनिमित्त खास प्लम केकला मोठी मागणी आहे. स्पेशल प्लम केक, रम केक, ड्रायफ्रूट्स प्लम केक यांसह फ्रेश क्रीम, चॉकलेट ब्राउनी, प्लम हनी, मिक्स फ्रूट, रिअल प्लम आणि रीच प्लम केक उपलब्ध आहेत. बेल्जियम चॉकलेट, पायनॅपल आणि चॉकलेट केक खास ऑर्डरवर तयार केले जात आहेत. स्वीट मार्टस्, बेकऱ्या, गिफ्ट शॉप्स तसेच चॉकलेट-केक शॉप्समध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत. घरगुती केक व्यावसायिकांकडेही यंदा ऑर्डर वाढल्या आहेत. कॅम्प परिसरातील पारंपरिक बेकऱ्यांसह विमाननगर, औंध, बाणेर, बावधन आणि प्रभात रस्ता भागातील बेकऱ्यांमध्ये केकचे आकर्षक प्रकार पाहायला मिळत आहेत.

यंदा हे आहे नवीन

सोनेरी-चंदेरी रंगांची फुले : ख्रिसमस ट्री सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडी फुलांची मागणी वाढली असून, सोनेरी-चंदेरी रंगांत ही फुले ५० ते १०० रुपयांत उपलब्ध आहेत.

सांताक्लॉजची प्रतिकृती : फुग्यासारख्या या सांताच्या आकृती दुकानांसमोर, हॉटेल्स व मॉलमध्ये आकर्षण ठरत आहेत.

नवीन प्रकारचे ट्री व सजावट : फोल्डिंग ट्री, टेबल ट्री, फोम ट्री, चेरी ट्री, डान्सिंग सांताक्लॉज तसेच लहान-मोठ्या आकारातील रेनडियर यांचा समावेश आहे.

Christmas Markets: जगभरातील ख्रिसमस मार्केट्स जे फक्त उजळत नाहीत...कथाही सांगतात! जाणून घ्या बजेट फ्रिडली फेस्टिव्ह डेस्टिनेशन

नाताळसाठी बाजारात आलेल्या आकर्षक वस्तू पाहूनच उत्साह वाढतो. परवडणाऱ्या किमतीत सुंदर सजावटीचे साहित्य उपलब्ध असल्याने आम्ही स्नो ख्रिसमस ट्री आणि त्यावरील सजावटीसाठी बॉल, घंट्या व तारे खरेदी केले.

- अनुजा मुळे, ग्राहक

यंदा लहान मुलांसह त्यांचे पालक ख्रिसमस ट्री आणि त्यावरील सजावटीच्या वस्तू आवर्जून घेत आहेत. हॉटेल्स आणि मॉलकडूनही सजावटीसाठी ऑर्डर मिळत आहेत. नागरिकांमधील उत्साहामुळे विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळतो.

- राकेश अगरवाल, व्यावसायिक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.