Vidarbha Cold Wave: हिवाळा रंगात, थंडी जोरात; नागपूरचा पारा ८.२ अंशांवर, गोंदिया @ ८
esakal December 23, 2025 03:45 AM

नागपूर : विदर्भातील थंडीची लाट दिवसेंदिवस तीव्र होत असून, रविवारी नागपूरचा पारा पुन्हा ८.२ अंशांपर्यंत घसरला, तर गोंदिया येथे सलग तिसऱ्या दिवशी विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद झाली. हवेतील प्रचंड गारठा लक्षात घेता सोमवारीही थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, रविवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला. शनिवारच्या तुलनेत रविवारी नागपूरच्या किमान तापमानात ०.४ अंशाची किंचित घट होऊन पारा यंदाच्या हिवाळ्यात तिसऱ्यांदा ८.२ वर आला.

हवेतील गारठ्यामुळे यावर्षी प्रथमच विदर्भातील अकरापैकी पाच जिल्ह्यांचे तापमान दहाच्या खाली आले आहे. विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद अर्थातच गोंदिया येथे झाली. येथे चोवीस तासांत ०.२ अंशाची अंशतः घसरण होऊन पारा ८.० वर स्थिरावला. गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितल्यास यावेळी प्रथमच गोंदिया येथे इतके दिवस नीचांक व थंडीचा कहर दिसून येत आहे.

याशिवाय यवतमाळ (८.५ अंश), वर्धा (९.४ अंश) व अमरावती (९.० अंश) या जिल्ह्यांसह भंडारा (१०.० अंश), अकोला (१०.१ अंश), गडचिरोली (१०.४ अंश), ब्रह्मपुरी (११.० अंश), वाशीम (११.२ अंश), चंद्रपूर (१२.० अंश) आणि बुलडाणा (१२.२ अंश) येथेही थंडीची तीव्र लाट राहिली.

हाडे गोठवणाऱ्या व अंगाला झोंबणाऱ्या गारेगार वाऱ्यांमुळे नागपूरकर सध्या चांगलेच त्रस्त आहेत. केवळ रात्रीच्या सुमारासच नव्हे, दिवसातही भुरभुर वारा लागतो. परिणामतः दिवसभर ऊनी कपडे घालून फिरावे लागत आहे. सायंकाळ होताच थंडीची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे थंडी घालविण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

Nagpur Cold : दोन दिवसांत सात अंशांनी घसरला पारा; नागपूर ११, भंडारा १० अंशांवर

थंडीचा सर्वाधिक प्रभाव ग्रामीण भागांमध्ये दिसून येत आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भातही आगामी काळात थंडीचा जोर कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तसा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.