-महेश माळवे
श्रीरामपूर: जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरलेल्या श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत अखेर मतदारांनी ससाणे कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. दिवंगत नेते जयंत ससाणे यांच्या कार्याची पावती देत चिरंजीव करण ससाणे यांना २४ हजार ७२४ मते देत नगराध्यक्षपदी विराजमान केले. या विजयात आमदार हेमंत ओगले यांची खंबीर साथ निर्णायक ठरली. काँग्रेसने २० जागांसह पालिकेवर एकछत्री अंमल मिळवला आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने पालिकेत दमदार प्रवेश केला आहे.
ससाणे-ओगलेंनी रोखला विखेंचा वारू२०१६ च्या पडझडीनंतर करण ससाणे यांनी आमदार हेमंत ओगले यांच्या मदतीने अत्यंत शिस्तबद्ध रणनीती आखली होती. वडिलांच्या सर्वसमावेशक राजकारणाचा वारसा जपत करण ससाणे यांनी ‘स्वाभिमानी श्रीरामपूर’ ही साद मतदारांना घातली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २८ सभा आणि स्वतः गल्लोगल्लीत तळ ठोकूनही भाजपला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. तसेच भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांना दुसऱ्या क्रमांकाची १७ हजार ९५७ मिळालेली मते ही आजवरची मोठी झेप असली, तरी सत्तेचे समीकरण जुळवण्यात विखेंना अपयश आले.
आदिकांचा पराभव, राष्ट्रवादीचा सुपडासाफ
२०१६ मध्ये ससाणे यांची सत्ता उलथवून लावणाऱ्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना मतदारांनी प्रभाग तीनमधून नाकारले आहे. त्यांच्या पराभवासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिकेत सुपडासाफ झाला असून, पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
दिग्गजांच्या वारसदारांची सरशीशिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होऊनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना मिळालेली ८ हजार मते ही त्यांच्या वैयक्तिक संघर्षाचा परिपाक मानली जात आहेत. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने तीन जागा मिळवत आपले अस्तित्व दाखवून दिले. विशेष म्हणजे निवडून आलेले तिन्ही चेहरे हे राजकीय वारसा असलेली आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या स्नूषा मंजुश्री, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव संतोष, शिवसेनेचे सागर बेग यांचे बंधू आकाश. या तिघांचा विजय शिंदे गटासाठी मोठे यश मानले जात आहे.
वंचित, बसपा, सपाला तीन अंकी मतेवंचित बहुजन आघाडी, बसपा आणि सपा यांना केवळ तीन आकडी मतदानावर समाधान मानावे लागले. एका अपक्ष उमेदवाराने आपल्या कामाच्या जोरावर विजय मिळवत प्रस्थापितांना धक्का दिला.
राजकीय वातावरण तापलेनिवडणूक काळात राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. काँग्रेसच्या तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले, तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरण आणि मारहाणीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या सर्व तणावपूर्ण वातावरणातही ‘स्वाभिमानी श्रीरामपूर’ ही टॅगलाईन घेऊन लढणाऱ्या काँग्रेसने तरुणांना संधी देत आणि शांतपणे प्रचार करत सत्ता खेचून आणली. विखेंनी केलेले विकासाचे आवाहन धुडकावून लावत श्रीरामपूरकरांनी पुन्हा एकदा ससाणे यांच्या ‘हाता’त शहराच्या विकासाची चावी दिली आहे.
राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्चित..श्रीरामपूरच्या नागरिकांनी कोणत्याही दडपशाहीला आणि प्रलोभनांना बळी न पडता सजग, स्वाभिमानी असल्याचे दाखवून दिले. शहरामध्ये शांतता, सामाजिक सलोखा राहावा, यासाठी माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून काँग्रेसला मतदान केले. श्रीमपूरला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच स्व. ससाणे यांची संघटना व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सहकारी, मित्र यांनी घेतलेल्या अहोरात्र कष्टाला हा विजय समर्पित आहे.
- करण ससाणे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष