Pune Municipal Corporation Election : सध्या राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीव राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच प्रमुख पक्ष राज्यात जोमात प्रचार करत आहेत. दुसरीकडे विजयाचे शिखर गाठण्यासाठी सध्या युती आणि आघाड्याचे गणित जुळवले जात आहे. मुंबई, पणे, ठाणे, पिंपरी चिंचवड या महानरपालिकांत काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे या प्रमुख महापालिकांसाठी युतीची नवी समीकरणं उदयास येत आहेत. याच समीकरणांना लक्षात घेऊन भविष्यात राज्यातील राजकारणाची वाटही बदलू शकते, असे तर्क राजकीय जाणकार लावत आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पावर गटाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच एक मोठं विधान करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे.
सध्या महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत. मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाने एकत्र येण्याचे ठरवले आहे. हे दोन्ही पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसनेही मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवून ठाकरे यांच्याशी युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीवर चर्चा चालू आहे. असेच काहीसे नवे समीकरण पुण्यात उदयास येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांचादेखील राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. या युतीसाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खुद्द अजित पवार यांनीच येत्या 26 डिसेंबर रोजी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली जाईल. कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील, असे सांगून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी धीर धरावा असा आदेश दिला आहे. अजित पवार 24 डिसेंबर रोजी या युतीसंदर्भात मुंबईत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले आहे. त्यामुळेच आता येत्या 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा झाल्यास राजकारणात नव्या नांदीला सुरुवात होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.