Viral Video: असाही अज्ञात रामभक्त! अयोध्येतील राम मंदिरात ३० कोटी रुपयांची सोने-चांदी-हिऱ्यांनी जडवलेली भव्य राममूर्ती अर्पण
esakal December 25, 2025 12:45 AM

Ayodhya Temple Viral Video: अयोध्येतील श्री राम मंदिरात लवकरच एक अत्यंत भव्य आणि मौल्यवान मूर्ती स्थापित होणार आहे. ही मूर्ती सोने, चांदी, हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांनी जडवलेली असून तिची किंमत सुमारे २५ ते ३० कोटी रुपये इतकी आहे. कर्नाटकातील एका भक्ताने ही मूर्ती राम मंदिराला दान केली आहे. त्याने आपले नाव देखील गुपीत ठेवले आहे. दक्षिण भारतीय शैलीतील कारागिरीने तयार झालेली ही मूर्ती १० फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. तिचे वजन अंदाजे ५ क्विंटल असावे, असे सांगितले जात आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मूर्तीची भव्यता आणि कलात्मकता पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मूर्ती दान करणाऱ्या व्यक्तीची किंवा समूहाची ओळख अद्याप उघड झालेली नाही. मूर्तीचे वजन निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच देणगीची पूर्ण माहिती जाहीर केली जाईल.

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिराचा परिसर होणार आणखी मोठा; बाहेरील भिंतीजवळची जमीन खरेदी करण्याचा निर्णय का? आकर्षक आणि कलात्मक

कर्नाटकहून अयोध्या हे सुमारे १७५० किलोमीटर अंतर आहे. ही मूर्ती विशेष व्हॅनमध्ये आणली गेली आणि मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता राम मंदिर संकुलात पोहोचली. संकुलातच ती उघडण्यात आली. तंजावर येथील कुशल कारागिरांनी या मूर्तीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यामुळे ती अत्यंत आकर्षक आणि कलात्मक बनली आहे.

ही मूर्ती संत तुलसीदास मंदिराजवळील अंगद टीला येथे स्थापित करण्याचा विचार आहे. स्थापनेपूर्वी मूर्तीचे अनावरण आणि नंतर प्राण प्रतिष्ठा समारंभ आयोजित केला जाईल. या कार्यक्रमासाठी देशभरातील संत आणि महंतांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

समारंभाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार

दरम्यान, राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा २७ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. राम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे मुख्य धार्मिक विधी ३१ डिसेंबर रोजी पार पडतील. धार्मिक कार्यक्रम २७ डिसेंबरपासून राम मंदिर संकुलात सुरू होऊन ३१ डिसेंबरपर्यंत चालतील. त्यानंतर २९ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात विविध सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, या सोहळ्याची तयारी सोमवारपासून सुरू झाली आहे. तात्पुरत्या यज्ञशाळा आणि मंडपांची उभारणी सुरू आहे. पाच दिवस चालणाऱ्या धार्मिक विधींसाठी आचार्य आणि वैदिक विद्वानांची टीमही जवळपास अंतिम झाली आहे. ३१ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता गर्भगृहात समारंभ सुरू होईल आणि दुपारी सव्वा बारा ते एक या वेळेत तो संपेल. या समारंभाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.

View this post on Instagram