देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा संपल्यानंतर आता विजय हजारे ट्रॉफीचा आनंद क्रीडाप्रेमींना लुटण्यास मिळत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळत आहे. पहिल्याच सामन्यात या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी शतकी खेळी केली. त्यांच्या शतकी खेळीने संघाला फायदा झाला. विराट कोहलीमुळे दिल्लीने, रोहित शर्मामुळे मुंबईने विजयाची चव चाखली आहे. त्यांची फटकेबाजीचे अपडेट प्रेक्षकांना वेळोवेळी मिळत होते. तशी त्यांची अस्वस्थता वाढत होती. कारण प्रत्यक्ष पाहण्याची अनुभूती काही मिळत नव्हती. मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाच हा आनंद घेता येत होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट होती. कारण या सामन्यांच लाईव्ह प्रसारण किंवा ऑनलाइन स्ट्रीमिंगही नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी श्रीमंत गणल्या जाणाऱ्या बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे. त्यात बीसीसीआयच्या नफ्याची बातमी समोर येताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने 2025 या वर्षात 3358 कोटींची कमाई केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने 2025 या वर्षात ड्रीम इलेव्हनशी असलेला करार मोडला. तरीही बीसीसीआयला इतका फायदा झाला आहे. बीसीसीआयने अपोलो टायर्स आणि एडिडाससारख्या दिग्गद कंपन्यांसोबत करार केला आहे. दुसरीकडे, बीसीसीआयला आयसीसीकडून नफ्यात मात्र तूट झाली आहे. बीसीसीआयला आयसीसीच्या एकूण कमाईतून 38.5 टक्के मिळतात. इतर क्रिकेट बोर्डाच्या तुलनेत ही कमाई अधिक आहे. तोटा सहन करूनही बीसीसीआयला 2025-26 या वर्षात 8963 कोटींची कमाई करू शकते.
बीसीसीआयची कमाईवर क्रीडाप्रेमींचा संताप होण्याचं कारण काय असावं? तर क्रीडाप्रेमींचं म्हणणं इतकंच आहे की इतके कोटी कमवता पण देशांतर्गत क्रिकेट लाईव्ह दाखवण्यासाठी योजना नाही याचं आश्चर्य आहे. गल्लीबोलातील टेनिस क्रिकेटही हल्ली लाईव्ह दाखवलं जातं. बीसीसीआयला लाज वाटेल इतकी त्याची स्पष्टता असते. विजय हजारे ट्रॉफी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत असलेल्या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं नाही. बीसीसीआयने त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आणखी संताप झाला. कारण त्याची क्वॉलिटी बघण्यासारखी नव्हती. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी बीसीसीआय हा पैसा नेमका कशासाठी वापरते असा प्रश्न उपस्थित केला आहे.