Blue Bird Block 2 : निघाला ISRO चा 'बाहुबली'! LVM3 रॉकेटने ब्लॉक-2 सॅटलाइट लॉन्च; अंतराळाशी डायरेक्ट कनेक्ट होणार मोबाईल, कसं? पाहा
esakal December 25, 2025 12:45 AM

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आज सकाळी 8:55 वाजता आपल्या सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM3 अर्थात 'बाहुबली'द्वारे अमेरिकन कंपनी AST स्पेसमोबाइलच्या ब्लूबर्ड ब्लॉक 2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे इस्रोच्या LVM3-M6 मोहिमेचे सहावे यशस्वी ऑपरेशन आहे आणि भारतीय भूमीवरून सोडलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार पेलोड आहे..सुमारे 6100 किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीच्या कमी कक्षेत (LEO) यशस्वीरित्या सेट झालाय.

हा उपग्रह जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण उपग्रह आहे. यात 223 चौरस मीटर आकाराचा विशाल फेज्ड अॅरे अँटेना आहे, जो अवकाशातून थेट सामान्य स्मार्टफोनला हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट पुरवतो. 4G आणि 5G नेटवर्कला सपोर्ट करणारा हा उपग्रह प्रति सेल 120 Mbps पर्यंत स्पीड देतो. व्हॉइस कॉल, व्हिडिओ स्ट्रीमिंग, टेक्स्टिंग सर्वकाही दुर्गम भागात, महासागरात किंवा डोंगराळ प्रदेशात शक्य होईल

कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये ब्लूबर्ड 1-5 उपग्रह प्रक्षेपित केले होते, ज्याने अमेरिका आणि इतर देशांत सतत कनेक्टिव्हिटी दिली. ब्लॉक-2 मध्ये मात्र 10 पट जास्त बँडविड्थ आहे.

हे अभियान न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) आणि AST स्पेसमोबाइल यांच्यातील व्यावसायिक करारांतर्गत पार पडले. इस्रोचे हे तिसरे पूर्ण व्यावसायिक प्रक्षेपण आहे, ज्याने भारताची जागतिक स्पेस मार्केटमध्ये ताकद पुन्हा सिद्ध केली.

43.5 मीटर उंच आणि 640 टन वजनाचे LVM3 हे स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे. याच्या तीन टप्प्यांत दोन सॉलिड बूस्टर, लिक्विड कोर आणि क्रायोजेनिक अप्पर स्टेज आहे. याआधी चंद्रयान-3, चंद्रयान-2 आणि वनवेब उपग्रह मोहिमा यशस्वी केल्या. हा यशस्वी उपग्रह स्टारलिंकसारख्या सेवांशी स्पर्धा करेल आणि जगभरात 24/7 कनेक्टिव्हिटी देईल. इस्रोच्या या कामगिरीमुळे भविष्यातील गगनयान मानव मोहिमेलाही बळ मिळेल

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.