Ichalkaranji Muncipal : प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात; महापालिका निवडणुकीपूर्वीच इचलकरंजीत राजकीय हालचालींना वेग
esakal December 25, 2025 02:45 AM

इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा केलेली नाही, पण संभाव्य उमेदवारांनी त्याची वाट न पाहता आपला प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे शहरातील बहुतांश भागात प्रचाराचा धुरळा आतापासूनच उडत आहे. उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांसह ठिकठिकाणी बैठका होत आहेत. त्यामुळे शहरात निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे.

Ichalkaranji Muncipal Corporation : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इचलकरंजीचे राजकारण तापले; इच्छुकांच्या गाठीभेटीमुळे शहरात नवे समीकरणांचे संकेत!

चारसदस्यीय प्रभाग पध्दती असल्यामुळे पक्षीय उमेदवारीला यावेळी महत्त्व आले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. विशेषतः भाजपकडे तर उमेदवारी कोणाला द्यायची, असा प्रश्न नेतेमंडळींना पडला आहे.

अनेक प्रभागांत रोज एक नवीन नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडून काही प्रभागांत सक्षम उमेदवारांची चाचपणी केली
जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे, पण एकाही पक्षाने एकाही उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही, पण प्रभागाचा भौगोलिक विस्तार पाहता आणि प्रचाराला मिळणारा कालावधी पाहता संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच धूमधडाक्यात प्रचार सुरू केला आहे.

Ichalkaranji Muncipal Corporation : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इचलकरंजीचे राजकारण तापले; इच्छुकांच्या गाठीभेटीमुळे शहरात नवे समीकरणांचे संकेत!

काही जणांनी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधत भेटीगाठीवर भर देत आहेत, तर काही प्रभागांत पॅनेलमधील अन्य संभाव्य उमेदवारांसमवेत प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. पक्षीय उमेदवारीसाठी कमालीची चुरस आहे. सर्वच प्रभागांत कमी-जास्त प्रमाणात अशी स्थिती आहे. त्यामुळे उमेदवारी मिळो न मिळो, त्याची वाट न पाहता प्रचाराला मात्र अनेक प्रभागांत गती येत असल्याचे दिसत आहे.

बिनविरोध पॅटर्नची धास्ती

गत नगरपालिका निवडणुकीत अचानक बिनविरोध पॅटर्नने जोरदार उसळी घेतली होती. तब्बल तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. आणखी काही जागा बिनविरोध होण्याच्या हालचाली होत्या, पण अंतिम टप्प्यात त्यामध्ये यश आले नाही.

यावेळी बिनविरोधचा पॅटर्न येणार काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे. आपल्या विरोधात कोण राहणार आहे, याची काही संभाव्य उमेदवारांकडून चाचपणी केली जात आहे. काही विशिष्ट प्रभागात तशी परिस्थिती
निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.