अयोध्या आणि दक्षिण कोरिया यांच्यातील ऐतिहासिक आणि भावनिक नाते आता एका नव्या रूपात जगासमोर येत आहे. शरयू नदीच्या काठावर विकसित करण्यात आलेल्या 'क्वीन हो मेमोरियल पार्क' मध्ये बसवण्यासाठी राणी हो यांचा १२ फूट उंच आणि १३०० किलो वजनाचा भव्य पुतळा सोमवारी अयोध्येत दाखल झाला आहे. 'रॉक स्टोन' मटेरियलपासून बनवलेला हा पुतळा अतिशय कलाकुसरीने तयार करण्यात आला असून २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 'इंडो-कोरियन फेस्ट' पूर्वी त्याचे अनावरण केले जाणार आहे.
View this post on Instagram
काय आहे राणी हो आणि अयोध्येचे नाते?
कोरियातील प्राचीन दंतकथांनुसार, सुमारे २ हजार वर्षांपूर्वी अयोध्येची राजकुमारी सुरिरत्ना ही नौकेने प्रवास करत सुमारे ४५०० किलोमीटरचे अंतर पार करून दक्षिण कोरियाला पोहोचली होती. तिथे तिचा विवाह राजा किम सुरो यांच्याशी झाला आणि ती 'राणी हो' (Queen Heo) म्हणून ओळखली जाऊ लागली. आजही दक्षिण कोरियातील सुमारे ६० लाख लोक स्वतःला या राणीचे वंशज मानतात आणि अयोध्येला आपले 'आजोळ' समजतात. दरवर्षी अनेक कोरियन नागरिक या नात्यामुळे अयोध्येला भेट देतात.
मेमोरियल पार्कमधील खास आकर्षणे
भारत आणि दक्षिण कोरियाच्या सहकार्याने उभारलेले हे स्मारक दोन्ही देशांच्या संस्कृतीचा संगम आहे.
कोरियन विलेज या पार्कमध्ये एक खास कोरियन गाव वसवण्यात आले आहे, जिथे कोरिया आणि अवधच्या पारंपारिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.
गोल्डन एग : ग्रॅनाईटपासून बनवलेले 'गोल्डन एग' हे राणी हो यांच्या समुद्री प्रवासाचे प्रतीक म्हणून तिथे बसवण्यात आले आहे.
सुविधा : पार्कमध्ये किंग आणि क्वीन पॅव्हेलियन, मेडिटेशन हॉल, ओपन एअर थिएटर आणि राणी हो यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन कक्ष तयार करण्यात आले आहेत.
पर्यटनाला मिळणार नवी झळाळी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम जोंग सुक यांनी २०१८ मध्ये या स्मारकाची पायाभरणी केली होती. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे अयोध्येच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेत मोठी भर पडणार आहे. राम मंदिराच्या निर्मितीनंतर अयोध्या आधीच जागतिक आकर्षणाचे केंद्र बनली आहे, त्यात आता या मेमोरियल पार्कमुळे दक्षिण कोरियातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हे स्मारक केवळ एक पर्यटन स्थळ नसून भारत आणि दक्षिण कोरियाच्या प्राचीन संबंधांची साक्ष देणारा एक जिवंत वारसा ठरेल.