Ichalkaranji City : क्रीडापंढरीची ओळख पुसली जातेय; इचलकरंजीतील मैदानांची अवस्था विदारक
esakal December 25, 2025 06:45 AM

इचलकरंजी : वस्त्रनगरी म्हणून देशभर ओळख असलेल्या इचलकरंजीने क्रीडा क्षेत्रातही इतिहास घडवला आहे. कबड्डी, खो-खो, क्रिकेटसह विविध खेळांमधून सुमारे ५५० हून अधिक खेळाडू थेट शासकीय सेवेत दाखल झाले.

राज्य, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवणारे हे शहर क्रीडापंढरी म्हणून गौरवले गेले. मात्र, याच क्रीडानगरीतील मैदानांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. खेळाडूंना घडवणाऱ्या पायाभूत सुविधांकडे आतापर्यंत गंभीर दुर्लक्ष झाले आहे. घोषणा होऊन महिने उलटले तरी क्रीडा संकुलाची फाईल अद्याप प्रक्रियेतच अडकून असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीनंतर नव्या सभागृहात मैदानांची तातडीने दुरुस्ती, नियमित देखभाल, मूलभूत सुविधा, नव्या मैदानांची उभारणी आणि क्रीडाविकासासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक यावर आता ठोस निर्णय घेतले जातात का, यावर शहराच्या क्रीडा भवितव्याची दिशा ठरणार आहे.
                - ऋषिकेश राऊत

Khasdar Krida Mahotsav : मैदानी खेळांकडे तरुणांचा ओढा वाढविण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सवात अक्षय कुमारचे आवाहन

शहरात मैदाने अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि आधुनिकीकरण पूर्णपणे थांबले आहे. स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, व्यायामशाळा यासारख्या मूलभूत सुविधा कागदावरच आहेत.

आज शहरातील बहुतेक मैदाने स्थानिक क्रीडा मंडळांच्या जीवावर चालू आहेत. महापालिकेची जबाबदारी असलेली देखभाल ही मंडळे स्वखर्चातून करत आहेत. खेळाडूंना सरावासाठी किमान सुविधा मिळाव्यात म्हणून मंडळांचे कार्यकर्ते स्वतः खर्च उचलत आहेत.

Premium| Women cricket World Cup 2025: भारतीय संघाने रचला इतिहास, पन्नास वर्षांनंतर अनुभवला सुवर्णक्षण

महापालिकेची भूमिका केवळ ‘मैदान आहे’ इतपतच मर्यादित राहिली आहे. रणजी क्रिकेट सामने झालेल्या राजाराम स्टेडियमची अवस्था प्रशासनासाठी लाजीरवाणी आहे. शहरातील सर्वांत मोठे व प्रशस्त स्टेडियम असूनही आज ते सुविधांसाठी झगडत आहे.

अनेक वर्षांत लाखो, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही या स्टेडियममधील तुटलेले पत्रे, तडे गेलेल्या भिंती, नादुरुस्त बैठक व्यवस्था, अस्वच्छ व खराब चेंजिंग रूम आणि दयनीय मैदान पाहता ‘निधी नेमका कुठे खर्च झाला?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हॉकी मैदानाची अवस्थाही तशीच आहे. खेळाडू घडवणाऱ्या शहरातच खेळाडूंना अपुऱ्या सुविधांमध्ये सराव करावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे. गेल्या १५ वर्षांत इचलकरंजी शहराचा विस्तार झपाट्याने वाढला. नवे प्रभाग, वाढीव वस्त्या, हजारो नवी घरे उभी राहिली. मात्र, या विस्तारासोबत नवीन क्रीडांगणे उभारण्यात प्रशासन मागे राहिले.

महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराला स्वतंत्र क्रीडा जिल्ह्याचा दर्जा मिळाला. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शहरात ४९ अनुदानित खेळ खेळविले जातात. मात्र, मैदानांची व साधनसामुग्रीची कमतरता इतकी तीव्र आहे की, खेळ घेण्यासाठी आयोजक शाळांनाच साहित्य बाहेरून मागवावे लागत आहे. क्रीडाप्रेमी आणि प्रशिक्षकांमध्ये ‘महापालिका प्रशासनाला क्रीडा विकासाबाबत गंभीरता नाही’ अशी भावना तीव्र होत आहे.

प्रमुख क्रीडांगणे

डायनॅमिक स्पोर्ट क्लब

जिम्नॅशियम मैदान

नामदेव मैदान

विठ्ठल रामजी शिंदे शाळा

पंचगंगा हौसिंग सोसायटी मैदान

हॉकी मैदान

आवळे मैदान

राजाराम स्टेडियम

राजमाता जिजाऊ क्रीडांगण

वंदे मातरम मैदान

शहरातील सध्याची मैदानाची स्थिती पाहता देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी नियुक्ती करणे आवश्यक आहे. जलतरण तलावात अत्याधुनिक सुविधांचा अभाव असून प्रेक्षकांसाठी गॅलरी नाही. स्वतंत्र जिल्ह्याचा शहराला दर्जा असल्याने महापालिकेने आता कायमस्वरूपी अनुभवी क्रीडा अधिकाऱ्याची नेमणूक करावी.

-विजय गुरव, माजी क्रीडा शिक्षक

इचलकरंजीने देशाला दर्जेदार खेळाडू दिले; पण, आज त्याच खेळाडूंना सरावासाठी मूलभूत सुविधा नाहीत. मैदानांची देखभाल वर्षानुवर्षे होत नाही. चेंजिंग रूम, मुबलक पाणी, लाईट व्यवस्था नसताना दर्जेदार खेळाडू घडवायचा तरी कसा? ही अवस्था क्रीडा मंडळांची आहे. निवडणुकीनंतर नव्या सभागृहाने तातडीने मैदानांचा मास्टर प्लॅन राबवला नाही, तर भविष्यातील शहराची क्रीडा प्रतिभा हरवेल.

- प्रा. शेखर शहा, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक

शहरातील मुली आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. खेळांमध्ये मुलींचा सहभाग वाढत असताना खास मुलींसाठी क्रीडा सुविधा कमी पडत आहेत. येणाऱ्या काळात स्वतंत्र खेळाडू मुलींसाठी महापालिकेने अत्याधुनिक इनडोअर क्रीडा संकुल उभारण्याची आवश्यकता आहे.

- सहिदा कच्छी, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व माजी क्रीडा संचालक

आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना जेव्हा इतर शहरांतील सुविधा पाहते, तेव्हा इचलकरंजीतील मैदानांची अवस्था मनाला लागते. शहरात मातीत सराव करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवर सामने खेळले. प्रतिभा असूनही सुविधा नसल्यामुळे शहरात अनेक चांगले खेळाडू अर्ध्यातच खेळ सोडतात. क्रीडापंढरी म्हणून ओळख टिकवायची असेल, तर अत्याधुनिक मैदानांची उभारणी करावीच लागणार आहे.

- वैष्णवी पवार, आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.