महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का, मोठी बातमी समोर
Tv9 Marathi December 26, 2025 02:45 AM

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. काही  दिवसांपूर्वी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीच्या वेळी देखील भाजपात जोरदार इनकमिंग झाल्याचं पहयाला मिळालं होतं. त्यानंतर आता महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत, येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.  मात्र त्यापूर्वी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असतानाच आता भाजपलाच मोठा दणका बसला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मीरा-भाईंदरमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये मोेठा पक्षप्रवेश झाला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं बळ मिळालं आहे. भाजपचे माजी नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वात आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महिला जिल्हाध्यक्षा ममता मॉरिस आणि युवक प्रदेश सरचिटणीस साजिद पटेल यांचीही यावेळी उपस्थिती होती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

युती आघाडी आणि पक्षांतराला वेग  

दरम्यान महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महापालिका निवडणूक जाहीर होताच आता युती आघाडीच्या चर्चांना देखील वेग आला आहे. बुधवारी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीची घोषणा करण्यात आली आहे, तर मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील आपली भूमिका जाहीर केली आहे,  भाजप सोडून कोणासोबतही युती करण्यास वंचित बहुजन आघाडीने तयारी दर्शवली आहे.  तर दुसरीकडे पक्षांतराला देखीव वेग आला आहे, अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. ऐनवेळी होणाऱ्या अशा पक्षांतरामुळे अनेक पक्षांची डोकेदुकी वाढली असून, पक्षांतराला ब्रेक लावणं मोठं आव्हान असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.