Kolhapur KMT : ग्रामीण ते शहरी प्रवासाचा आधार; केएमटी सक्षमीकरणासाठी नियोजनाची गरज तीव्र
esakal December 26, 2025 08:45 AM

कोल्हापूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे शहराच्या दळणवळणाच्या वाहिन्या आहेत. नफ्याचा विचार न करता नागरिकांना सेवा दिली जाते. अनके वर्षांपासून ही व्यवस्था अधिक सक्षम पाहिजे, यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते.

त्यातून काही बसेस नव्याने आल्यामुळे कोल्हापूरकरांचा वातानुकूलित बसेसमधून प्रवास सुरू झाला. आगामी काळात इलेक्ट्रिक बसेसमधून प्रवास करता येणार आहे. यासाठी नियोजन सुरू आहे. त्यामुळे ‘देर आये, दुरुस्त आये’ अशा टप्प्यावर केएमटी आहे.
                - लुमाकांत नलवडे

Kolhapur City : १५ वर्षे चर्चा, शून्य अंमलबजावणी; उड्डाणपूल कागदावरच, गुदमरतेय कोल्हापूरची वाहतूक कोंडीत

शहराची हद्दवाढ झाली नसली तरीही  शेजारील ग्रामीण भागात महापालिकेकडून पाणी आणि केएमटी बसची सुविधा दिली जाते. शहरात येण्यासाठी केएमटी बस ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हक्काची सुविधा आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी, शेतकरी, नोकरदार, भाजीपाला उत्पादक याचा रोज लाभ घेतात. बसची सुविधा दिली तरी ती तितकी सक्षम नाही, त्यामुळे पर्यायाने खासगी वाहनांचा वापर वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील फेऱ्या अधिक आहेत.

Kolhapur City : हद्दवाढीअभावी कोल्हापूरचा श्वास कोंडला; विकास, उत्पन्न आणि भवितव्य धोक्यात

काही वर्षांत वातानुकूलित बसेस उपलब्ध झाल्या आहेत. सकाळी सहा ते रात्री ११ दरम्यान शहरातील ही बससेवा फायद्यात नाही. त्यामुळे पर्यायाने अंतर्गत व्यवस्थेत, बसेसवर जाहिरातीतून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. सायंकाळी आणि सकाळी बसेस फुल्ल असतात.

अधिक सक्षम आणि सुखकर प्रवासासाठी इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. सुमारे २९९ कोटींचा हा प्रकल्प आहे. पुढील वर्षात तो प्रत्यक्षात येईल, असा विश्वास केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय सरनाईक यांना व्यक्त केला.

प्रस्तावित कामे

बस चार्जिंगसाठी बुद्ध गार्डन येथे नव्याने डेपो होणार

 चार्जिंगच्या १०० बसेस येणार

केंद्र शासनाकडून प्रकल्प उभारणीचे काम सुरू

सिव्हिल कामासाठी केंद्र ६० आणि ४० टक्के राज्य शासन खर्च करणार

पहिल्या टप्प्यात २० बसेस येणार, २०० कोटींचा प्रकल्प दृष्टिक्षेपात..

परिवहन विभागाची स्थापना - १ एप्रिल १९६२

केएमटी एकूण बसेस -८४, पैकी ९ वातानुकूलित

बंद असलेल्या बसेस - १०

रोजचे प्रवासी  -४५ हजार

 रोजचे उत्पन्न-  साडेसात ते पावणेआठ लाख

 एकूण मार्ग - २२

 शहरातील मार्ग ७ ते ८

 शहर-ग्रामीण मार्ग- १५

कायम कर्मचारी -३००

कंत्राटी व रोजंदारी कर्मचारी -२४०
उत्पन्नाचे मार्ग -

पार्किंगमधून उत्पन्न (वार्षिक) बिंदू चौक - १ कोटी ७१ लाख

जाहिरात आणि इतर - १५ लाख

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी केएमटी बस वरदान आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांना, विद्यार्थ्यांना ५० टक्के दरात ही सेवा दिली जाते. सध्या खासबाग येथून विद्यार्थ्यांना काही बसेसमध्ये गर्दीत बसावे लागते, उभे राहून जावे लागते. यासाठी केएमटीच्या बसेसची आणि फेऱ्यांची संख्या वाढवावी. सुखकर आणि वेळेवर प्रवासाची खात्री मिळाल्यास केएमटी अधिक सक्षम होईल.

- तेजस धडाम, पेटाळा

केएमटी बसेसच्या फेऱ्यांचे योग्य नियोजन झाल्यास वडापसह अन्य पर्यायी वाहनांवर परिणाम होईल. नागरिकांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास करणे शक्य होईल. अजूनही केएमटी बसेसची सुविधा दर्जेदार नाही. सकाळी आणि सायंकाळी काही बसेसमध्ये उभे राहण्यासाठी जागा नसते. महिला-मुलींना गर्दीतूनच प्रवास करावा लागतो. यासाठी केएमटीकडे अधिक बसेसची व्यवस्था झाली पाहिजे.

- नंदकुमार मोरे, पेटाळा

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम हवी. यासाठी महापालिकेसह लोकप्रतिनिधींनी अधिक पुढाकार घ्यावा. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण झाल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होईल. पर्यायाने शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. महापालिकेच्या परिवहन विभागाचे उत्पन्न वाढेल. महिलांना अधिक सुरक्षित प्रवास होण्यास मदत होईल.

- गंगा खोंद्रे,पेटाळा परिसर

केएमटी बसची सुविधा माफक दरात उत्तम आहे. उपनगरांतून कार्यालयात येणाऱ्यांना ही सेवा फायद्याची ठरेल. यावर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना अर्ध्या दरात तिकीट आणि पासेसची सुविधा आहे. ही सेवा अधिक सक्षम केल्यास केएमटीच्या प्रतिसादात दुपटीने वाढ होईल. वातानुकूलित बसेस असाव्यात. अधिक फेऱ्या असाव्यात.

- अनिल मगदूम, रमणमळा

केएमटीची व्यवस्था सक्षम केल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी  होईल. इलेक्ट्रिक बसेस आल्यास अधिक स्वस्तात प्रवास होईल. यासाठी परिवहन वाहतूक समितीची स्थापना झाली पाहिजे. यात प्रवासी नागरिकांचा समावेश पाहिजे. महिन्यातून एक बैठक झाली पाहिजे. प्रत्येक बसमध्ये तक्रार पेटी हवी. महिलांना सीट राखीव आरक्षण आहेत. तशाच विद्यार्थ्यांसाठीही आवश्यक आहेत.

- सचिन रणदिवे, कसबा बावडा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.