ढिंग टांग - विलोपले मनोमिलनात या..!
esakal December 26, 2025 08:45 AM

स्थळ : अज्ञात. वेळ : मध्यरात्रीची…सोयीची. पात्रे : तीन!

दादासाहेब : (अंधाऱ्या दालनात दबकत शिरत) कुणी आहे का हितं? की मी एकलाच आलोय?

भाईसाहेब : (अंधारातून) मी आलोय, या!

नानासाहेब : (अंधारातूनच) मी तुमच्या आधीपासून येऊन बसलोय!

दादासाहेब : (अंधारात खुर्ची शोधत) मीटिंग बोलावली म्हणून मेसेज आला होता, म्हणून-

नानासाहेब : (खुलासा करत) मीच फॉर्वर्ड केला होता!

भाईसाहेब : (ताबडतोब खुलासा करत) मी आधी फॉर्वर्ड केला होता…

नानासाहेब : (दादासाहेबांच्या दिशेने बघत अंधारातच) कुठवर आली तुमची युतीची तयारी?

दादासाहेब : (गुळूमुळु उत्तर देत) चाल्लंय! हुईल! जमवू!!

भाईसाहेब : (मनोमिलनाच्या धक्क्यातून बाहेर न येता…) तिकडे शिवाजी पार्कात मनोमिलन झालंसुध्दा! आपण जोर लावायला हवा आता!!

दादासाहेब : (अजूनही गुळमुळीत) लावू! करु काहीतरी! होऊन जाईल!!

नानासाहेब : (हिणवत) कसलं ते डोंबलाचं मनोमिलन! खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला!

भाईसाहेब : (आसुरी आनंदात) खीक!!\

दादासाहेब : (इशारा देत) तसा मुंबईचा आपला फारसा संबंध नाही, पण शत्रूला कमी लेखू नका, येवढं सांगतो! शत्रू प्रबळ असेल आणि पंगा घ्यायचा नसेल तर सरळ युती करुन टाकावी, हा राजकारणाचा पहिला नियम आहे!

भाईसाहेब : (बेसावधपणाने) एकदम बरोबर!! पंगा नहीं, तो सब चंगा!!

नानासाहेब : (आणखी चेवात येत) कसला पंगा नि काय!! हा त्या भावाभावांचा प्रीतिसंगम नाही, तर भीतिसंगम आहे!!

दादासाहेब : (किंचित नाराजीनं) तुम्हीही आता त्यांच्यासारख्या शाब्दिक कोट्या करायला लागलात की!! भले!!

भाईसाहेब : (खिसा चाचपत) मी तर हल्ली शेरोशायरीकडे वळलोय! इलाखा किसी का भी हो, धमाका हम ही करेंगे, वगैरे!!

नानासाहेब : (मूळ मुद्द्याकडे वळत) आपण आपली युती जाहीर करु सावकाश! पण यावेळी आपण मुंबई विकासाच्या मुद्द्यावर जिंकायची आहे! शेरोशायरी आणि डायलॉगबाजीच्या जोरावर नाही…

भाईसाहेब : (घोडं दामटत) ते रहमान डकैतचं पण आणू या!! मुंबई लुटणारा रहमान डकैत कोण? हे मी सगळ्या प्रचारसभांमध्ये विचारणार आहे!!

नानासाहेब : (खुशीत) आजपर्यंत ते विकासावर एकही शब्द बोललेले नाहीत, त्यामुळे मी दरवेळी पैज जिंकत आलोय!

दादासाहेब : (हात झटकत) तुम्ही पैजाही जिंका, आणि निवडणुकाही जिंका! तुमचं ते चालू द्या, पण पुणे माझ्यावर सोडा, येवढंच माझं म्हणणं!!

भाईसाहेब : (संधी साधत) …आणि ठाणं माझ्यावर सोडा!

नानासाहेब : (समजूत घालत) आपली महायुती आहे ना?

दादासाहेब : (हात जोडत) सगळं मान्य आहे, पण काही ठिकाणी स्वबळ दाखवावं लागतं, हा राजकारणाचा दुसरा नियम आहे!!

भाईसाहेब : (च्युइंगम चघळत) काँग्रेससारखं स्वबळ दाखवून काय उपयोग? लोक हसतील!!

नानासाहेब : (पुरेश्या गांभीर्यानं) यावेळी फुटाल तर संपाल, असं म्हणालेत ते दोघेही भाऊ!! हे ‘बटेंगे तो कटेंगे’चं मराठी भाषांतर आहे!!

भाईसाहेब : (दाढी खाजवत) मला बटेंगे तो कटेंगे हेच आजवर मराठी वाटत होतं…असू दे, असू दे!!

दादासाहेब : (घड्याळात बघत) मी निघू? मला लगेच पुण्याला जायचंय! तिथं जागावाटपाची चर्चा चालू आहे…

नानासाहेब : (मूठ वळून हवेत फेकत) यावेळी आपण विकासाच्या मुद्द्यावर महापालिकांचं रणांगण जिंकू! ऐतिहासिक विजय मिळवू!! विजयी भव!!

भाईसाहेब (मूठ हवेत फेकत) ऐतिहासिक विजय झाला नाही तरी चालेल, त्यांचा ऐतिहासिक पराभव करु!! जय महाराष्ट्र!!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.