कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाने महायुतीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार बाळ्या मामा म्हात्रे ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रवक्ते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, प्रदेश सचिव ब्रिज दत्त, सचिव नवीन सिंग, मुन्ना तिवारी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत जागावाटपावर एकमत झाले आहे. यानुसार आता 122 जागांपैकी 55 जागेवर काँग्रेस, 40 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट, 15 जागांवर वंचित लढणार आहे. उरलेल्या 12 जागा इतर मित्र पक्षांना दिल्या जाणार आहेत.
राजाभाऊ पातकर काय म्हणाले?या आघाडीवर बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी म्हटले की, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दोन्ही घटक पक्षांनी बसून ज्या जागा जिंकणार आहे त्या ठिकाणी एकमेकांना प्राधान्य देण्यात आलं. या बैठकीला खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 52 ते 55 जागा काँग्रेस पक्ष लढणार 45 ते 47 जागा राष्ट्रवादी घेणार वंचित सोबत देखील बोलणं सुरू आहे. त्यांच्यासाठी देखील काही कोटा ठेवलेला आहे तर 12 जागा आम्ही राखीव ठेवले आहेत.
वंचितसोबत बोलणं सुरूपुढे बोलताना पातकर म्हणाले की, वंचितसोबत आमचं बोलणं सुरू आहे, सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना देखील चांगल्या प्रकारे जागावाटप देण्याचे ठरवले आहे. आमच्याकडे खूप इन्कमिंग सुरू आहे, अनेक बड्या नेत्यांचे फोन चालू आहे. दोन दिवसात सगळं चित्र समोर येईल. 256 जणांनी काँग्रेसच्या मुलाखाती दिल्या आहेत. यावेळेला काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येणाऱ्या पालिकेमध्ये काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत राहणार आहे.
आघाडीचा महापौर बसवण्याचा प्रयत्न सुरूराजाभाऊ पातकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, राष्ट्रवादी व आमच्यात एक दोन जागेचा काही फरक असला तरी ते बसून आम्ही पूर्ण करू, कारण आमचं लक्ष फक्त महानगरपालिका आहे. दोन ते चार जागा छोटा भाऊ मोठा भाऊ असं समजून आघाडीचा महापौर कसा बसेल यासाठी प्रयत्न करू. शिवसेना ठाकरे गटांसोबत आमचं बोलणं झालेलं, मात्र तिकडं जो प्रतिसाद पाहिजे होता, तो मिळाला नाही. दोन दिवस बाकी आहेत, त्यामध्ये काही घडामोडी होऊ शकतात. आम्ही वेट अँड वॉच ची भूमिकेत आहोत.
महायुतीतील वादावर बोलताना पातकर म्हणाले की, महायुती कर्माचे भोग भोगत आहे, त्यांना कर्माचे भोग मिळत आहेत. इकडून तिकडून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घेतले, सगळ्यांना शब्द दिले आता त्यांचे शब्द पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.