कधी नावही ऐकलं नाही, त्या खेळाडूच्या नावाने टी-20 क्रिकेट हादरलं! सात धावा देत घेतल्या 8 विकेट्
Marathi December 29, 2025 06:25 PM

कोण आहे सोनम येशे मराठी बातम्या : टी20 क्रिकेट हे फलंदाजांचे मैदान मानले जाते, जिथे गोलंदाजांची सातत्याने धुलाई होत असते. मात्र भूटानमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात असे काही घडले, की त्यावर विश्वास ठेवणेही कठीण झाले आहे. भूटानचा 22 वर्षांचा खब्बू फिरकीपटू सोनम येशी याने आपल्या अप्रतिम कामगिरीने इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय, लीग किंवा देशांतर्गत कोणत्याही स्तरावर आजवर जगातील नामांकित गोलंदाजांनाही जे जमले नाही, ते पराक्रम सोनम येशीने करून दाखवला आहे.

सोनम येशीने 4 षटकांत 8 बळी घेत टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा ऐतिहासिक पराक्रम त्याने शुक्रवारी गेलेफू येथे म्यानमारविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केला. यासह, टी20 क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावर एका डावात 8 विकेट घेणारा सोनम येशी हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

डोळ्यांवर विश्वास बसेना… 8 विकेट्स, 7 रन आणि इतिहास रचला गेला….

या सामन्यात भूटानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 बाद 127 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना म्यानमारचा संघ सोनम येशीच्या फिरकीसमोर पूर्णपणे हतबल ठरला. सोनम येशीने फक्त 7 धावा देत 8 विकेट्स घेतल्या आणि म्यानमारचा संपूर्ण संघ 45 धावांत गारद झाला. हा सामना आणि संपूर्ण मालिका भूटानसाठी पूर्णतः एकतर्फी ठरली. या मालिकेत सोनम येशीने 4 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या आहेत. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना आज, सोमवार (29 डिसेंबर) रोजी खेळवला जाणार आहे.

सिजरूल इदरूसचा विक्रम मोडीत

याआधी टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम मलेशियाच्या सिजरूल इदरूस याच्या नावावर होता. त्याने 2023 मध्ये चीनविरुद्ध 8 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, सोनम येशीच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता टी20 क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये इदरूसच्या आधी सोनम येशेचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल.

कोण आहे सोनम येशी? (Who is Sonam Yeshey)

3 डिसेंबर 2003 रोजी जन्मलेला सोनम येशी हा भूटान क्रिकेटमधून पुढे आलेला क्रिकेटपटू आहे. वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यापूर्वी त्याने भूटानच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सोनम येशीने जुलै 2022 मध्ये भूटानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मलेशियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने 16 धावांत 3 विकेट्स घेतल्या आणि वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी आपली गुणवत्ता सिद्ध केली. आतापर्यंत सोनम येशीने 34 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 37 विकेट्स घेतल्या असून, तो भूटानच्या गोलंदाजीचा प्रमुख आधार बनला आहे.

हे ही वाचा –

Virat Kohli News : न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर होण्याआधीच विराट कोहलीचा मोठा निर्णय! 6 जानेवारीला पुन्हा मैदानात उतरणार, कोणत्या संघाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.