Cricketer Retirement: दिग्गज अष्टपैलूची ३५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, दोन वर्षांपूर्वी खेळलाय शेवटचा कसोटी सामना
esakal December 30, 2025 06:45 AM
  • न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलने ३५ व्या वर्षी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

  • १८ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने २८ कसोटी, २१ वनडे आणि २० टी२० सामने खेळले.

  • त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळले आहे.

यावर्षी आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यात आता आणखी एक नाव सामील झाले आहे. न्यूझीलंडचा ३५ वर्षीय डग ब्रेसवेल याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. १८ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर अष्टपैलू असलेल्या ब्रेसवेलने (Doug Bracewell) क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.

Cricket Retirement: ३९० हून अधिक विकेट्स अन् २७०० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा! १४ वर्षांनंतर केलं अलविदा

क्रिकेटचा वारसा लाभलेल्या ब्रेसवेल कुटुंबातून आलेल्या डगने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले. त्याच्या बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे या हंगामात त्याला फारसे क्रिकेट खेळता आले नाही. अखेर त्याने निवृत्तीचा (retirement) निर्णय जाहीर केला आहे. ब्रेसवेलचे वडील आणि काका देखील न्यूझीलंडसाठी खेळले आहेत.

तसेच त्याचा चुलत भाऊ मायकल ब्रेसवेल सध्या न्यूझीलंड संघाचा भाग असून जानेवारी २०२६ मध्ये भारताविरुद्ध वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाचे नेतृत्वही करणार आहे. डग आणि मायकल हे दोन टी२० आणि एक कसोटी सामना न्यूझीलंडसाठी एकत्र खेळले आहेत.

त्याच्या निवृत्तीबद्दल त्याचा देशांतर्गत संघ सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या स्टेटमेंटमध्ये त्याने म्हटले आहे की 'माझ्या आयुष्यातील हा अभिमनास्पद भाग राहिला आणि याबाबत मी युवा क्रिकेटपटू असताना आकांक्षाही बाळगली होती.

क्रिकेटमधून मला मिळालेल्या सर्व संधीबद्दल आणि देशासाठी व सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठी खेळण्याच्या मिळालेल्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हा सन्मान आहे. जितका काळ मी खेळलो, मजा केली, त्याबद्दल मी आनंदी आहे.'

१९ वर्षांखालील न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर डग ब्रेसवेलने २००८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठी पदार्पण केले होते. त्याने २०११ मध्ये न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २०११ ते २०२३ दरम्यान तो न्यूझीलंडसाठी २८ कसोटी, २१ वनडे आणि २० टी२० सामने खेळला. या एकूण ६९ सामन्यांमध्ये मिळून त्याने १२० विकेट्स घेतल्या आणि ९१५ धावा केल्या.

त्याची लक्षात राहणारी कामगिरी म्हणजे डिसेंबर २०११ मध्ये होबार्टला झालेल्या कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६० धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे २६ वर्षांनंतर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला होता. डग ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी २०२३ मध्ये अखेरचा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध वेलिंग्टनला खेळला.

Cricketer Retirement: भारताच्या ३६ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय; दोनदा जिंकला होता BCCI चा पुरस्कार

डग ब्रेसवेलने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत १३७ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्याने ४२२ विकेट्स घेतल्या आणि ४५०५ धावा केल्या. तसेच ९३ लिस्ट ए सामन्यांत ११२ विकेट्स घेतल्या आणि १४५८ विकेट्स घेतल्या. ९९ टी२० सामन्यांमध्ये त्याने १०३ विकेट्स घेतल्या आणि १२७४ धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.