शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी
Tv9 Marathi December 30, 2025 06:45 AM

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे,  अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्याचं राजकारण रंगलं आहे. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची आघाडी झाली आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची आघाडी आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे, दरम्यान मुंबईमध्ये जी युती आणि आघाड्यांची परिस्थिती आहे, तीच परिस्थिती कमी अधिक फरकाने राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीमध्ये पहायला मिळत आहे. ऐनवेळी झालेल्या युती आणि आघाड्यांच्या निर्णयामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेलं आहे. तसेच निष्ठावंताना डावलून पक्षात नव्यानं आलेल्या लोकांना तिकीट मिळत आहे. त्यामुळे निष्ठावंत नाराज आहेत.

आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे.   शिवसेना शिंदे गटाचे नेते अक्षय ठाकूर यांनी घरवापसी केली आहे, त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये अक्षय ठाकूर यांनी पक्षात प्रवेश केला. ते आता कळवामधील प्रभाग क्रमांक 24 मधून निवडणूक लढवणार आहेत.

जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाणे महापालिकेवर पडलेला दरोडा थांबवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.  काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्याशी बोलणार आहे. काही वाद असतील तर मिटवण्याचा प्रयत्न करू,  उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होणार आहेत, असं यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना शिंदे गटासोबतच इतरही पक्षात नाराजी नाट्य पहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.