रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाच्या या अनुभवी जोडीने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून एकाच वेळेस निवृत्ती घेतली. रोहित आणि विराटने 2024 मध्ये वर्ल्ड कप विजयानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर या अनुभवी जोडीने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटला रामराम केला. त्यानंतर भारताची ही अनुभवी जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदिवसीय सामनेच खेळत आहेत. दोघांनी 2025 या वर्षात बॅटिंगने अप्रतिम कामगिरी केली. भारताला विराट आणि रोहितने 2025 मध्ये अनेक सामन्यांत एकहाती विजय मिळवून दिला. रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. आता दोघांसाठी आगामी 2027 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर 2026 हे वर्ष फार निर्णायक असं ठरणार आहे. यानिमित्ताने रोहित-विराट या 2026 वर्षात किती एकदिवसीय सामने खेळणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया 2026 वर्षात 18 एकदिवसीय सामने खेळण्याची शक्यता आहे. टीम इंडिया मायदेशात आणि विदेशात एकूण 6 वेगवेगळ्या संघांविरुद्ध हे सामने खेळणार आहे. फिटनेस आणि फॉर्म कायम ठेवल्यास रोहित आणि विराट या दोघांनाही सर्व सामन्यात संधी मिळेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भारताचं 2023 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग झालं होतं. भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं. तेव्हापासून रोहित आणि आणि विराट या अनुभवी जोडीने आगामी 2027 वनडे वर्ल्ड कप जिंकूनच निवृत्त व्हावं, अशी चाहत्यांची आशा आहे. आता रोहित-विराट केव्हापर्यंत खेळणार हे निश्चित नाही. मात्र या दोघांना वर्ल्ड कप संघात स्थान मिळवायचं असेल तर 2026 वर्षात सातत्याने धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया 2026 मधील पहिली एकदिवसीय मालिका न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. मायदेशात 11 ते 18 जानेवारी दरम्यान 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. विराट आणि रोहित या मालिकेतून नव्या वर्षात चांगली सुरुवात करु शकतात.
टीम इंडिया त्यानंतर थेट जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 14 ते 19 जुलै दरम्यान 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.
त्यानंतर टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध ऑक्टोबर महिन्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका नियोजित आहे. रोहित-विराटला या मालिकेत धमाका करण्याची संधी असणार आहे.
ब्लू आर्मी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्या न्यूझीलंड दौऱ्यात 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया पुन्हा मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.