साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीत येणार! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकीचा 'पुणे पॅटर्न;' जाेरदार हालचाली सुरू..
esakal December 31, 2025 11:46 PM

सातारा : पालिकांच्या निवडणुकीतील भाजपचा विजयाचा वारू रोखण्यासाठी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रित लढण्याचा ट्रेंड आता सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून हालचाली व चर्चा सुरू आहेत. दोन्ही गटांतील जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून याबाबत दुजोरा मिळत असला, तरी अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झाला नाही. निवडणुका जाहीर होण्याच्या दरम्यानच यावर अंतिम मोहर उमटेल; पण दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांत मात्र, याबाबत उत्सुकता ताणली आहे.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणेच आता सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचा वाढता प्रभाव आणि संभाव्य विजयाचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून एकजुटीचा फॉर्म्युला आखला जात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

जिल्ह्यात भाजपने मागील काही निवडणुकांत आपली ताकद वाढवली असून, ग्रामीण भागातही पक्षाने प्रभावी पाय रोवले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी समन्वयाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही गटांतील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर चर्चा सुरू असून, ‘मैदानात वेगवेगळे उतरल्यास भाजपचा फायदा होईल’ या वास्तवाची जाणीव दोन्ही बाजूंना झाली आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेप्रमाणे आघाडी किंवा समन्वयातून निवडणूक लढवण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन आहे. जर ही एकजूट प्रत्यक्षात आली, तर सातारा जिल्हा परिषद निवडणूक मोठ्या राजकीय उलथापालथीची साक्षीदार ठरू शकते. भाजपच्या विजयाच्या शक्यता रोखण्यासाठी राष्ट्रवादीची ही खेळी कितपत यशस्वी ठरते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ४१ सदस्य होते, तर काँग्रेस सात, भाजप सहा, शिवसेना दोन, अपक्ष दोन, आघाड्यांचे सात सदस्य होते. जिल्हा परिषदेवर १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे.

आता जिल्ह्यात भाजपने पाय रोवल्यामुळे या वेळेस भाजप कमळ चिन्हावर लढणार आहे. कोणत्या परिस्थितीत भाजपचा अध्यक्ष करण्यावर नेत्यांनी भर दिला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यासह भाजपचे प्रमुख नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत आणण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. भाजपचा हा वारू रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन प्रयत्न करू शकतात. अन्यथा त्यांना जिल्हा परिषदेतील आहे ही सदस्य संख्याही कायम राखता येणार नाही.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या माध्यमातून एकजुटीबाबत विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेतील ताकद कमी होऊ शकते. याचा फायदा भारतीय जनता पक्ष उठवून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवू शकतो.

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं? जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
  • सध्याची सदस्य संख्या ६५

  • मागील सदस्य संख्या ६४

  • राष्ट्रवादीचे ४१

  • काँग्रेस सात

  • भाजप सहा

  • शिवसेना दोन

  • अपक्ष एक

  • आघाडी सात

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.