खेळणार की नाही? टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला धक्का, भक्कम फलंदाजाचं अचानक ऑपरेशन
GH News January 08, 2026 06:12 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. भारतात स्पर्धा असल्याने गतविजेती टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे. यासाठी संघाची बांधणी करण्यात आली असून सर्वांच्या जबाबदारीही ठरल्या आहेत. असं असताना टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण मधल्या फळीत भक्कम बाजू सावरणारा फलंदाजाची अचानक सर्जरी करावी लागली आहे. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून तिलक वर्मा आहे. तिलक वर्माने आशिया कप टी20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याचं संघाच असणं खूपच गरजेचं आहे. पण विजय हजारे ट्रॉफीत हैदराबाद संघाची धुरा तिलक वर्माच्या खांद्यावर आहे. या स्पर्धेत खेळताना त्याला दुखापत झाली आणि तात्काळ सर्जरी करावी लागली. तिलक वर्माला या स्प्रधेत खेळताना टेस्टिकुलर पेन झालं होतं. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. स्कॅन केल्यानंतर टेस्टिकुलर टॉर्शन झाल्याचं कळलं आणि लगेच ऑपरेशन केलं गेलं. तिलक वर्माचं ऑपरेशन यशस्वी झालं पण आता मैदानात परतणार कधी? असा प्रश्न आहे.

भारतीय संघाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी चाचणी परीक्षा आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत तिलक वर्मा खेळणार की नाही असा प्रश्न आहे. त्यानंतर 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. सध्या झालेल्या सर्जरीमुले त्याच्या खेळण्याबाबत संशय आहे. त्याच्या मैदानातील पुनरागमनाबाबत अधिकृतरित्या काहीच समोर आलेलं नाही. पण सध्याची स्थिती पाहता मैदानापासून तीन ते चार आठवडे दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिलक वर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही.

तिलक वर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही तर त्याची जागा श्रेयस अय्यर घेऊ शकतो. कारण तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळतो. जर तिलक वर्मा आऊट झाला तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची जागा पक्की होईल. तर चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर हा दावेदार राहील. सध्या श्रेय अय्यर दुखापतीतून सावरला असून विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने आपला फॉर्म दाखवून दिला. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याचं नाव आहे. अशा स्थितीत त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. श्रेयस अय्यरने 2017 मध्ये भारतासाठी पहिला टी20 सामना खेळला होता. त्यानंतर 2023 नंतर या फॉर्मेट खेळला नाही. त्याने भारतासाठी 51 टी20 सामने खेळले असून 1104 धावा केल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.