Harshvardhan Sapkal : "पैसा फेको आणि तमाशा देखो अशी भाजपची स्थिती"; हर्षवर्धन सपकाळ यांचा पुण्यातून हल्लाबोल!
esakal January 10, 2026 06:45 AM

पुणे : भाजपचे नेते इमारतींचा पुनर्विकास, टक्केवारी यातच गुंतले आहेत. त्या पक्षाच्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे विचार बाजूला सारले आहेत. स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवण्याऐवजी भाजप खान की बाण, उर्दू की मराठी, उत्तर प्रदेश की महाराष्ट्र अशा विभाजनवादी प्रश्नांवर निवडणूक लढवीत आहे. पैसा फेको आणि तमाशा देखो अशी स्थिती भाजपची झाली’’ अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

महर्षी नगर, मुकुंद नगर, सॅलिसबरी पार्क, लुल्लानगर प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सपकाळ यांची शुक्रवारी (ता. ९) मुकुंदनगर येथे सभा झाली. या वेळी प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, अमीर शेख, भाऊसाहेब आसबे व उमेदवार उपस्थित होते.

Harshwardhan Sapkal : देवाभाऊ नव्हे घेवाभाऊ; सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका

सपकाळ म्हणाले, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’ सुरू आहे. भाजपच्या नेत्यांना ‘जय जिनेंद्र’ म्हणणाऱ्या अजित पवारांनी ही ‘मिलीभगत’असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपसोबत सत्तेत असलेले अजित पवार आता त्यांच्यावर टीका करीत आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊन स्पष्ट भूमिका घ्यावी. कमिशन खोरी, कोयता गँगच्या माध्यमातून गुंडांना पाठबळ, जमिनी लाटणे असे प्रकार शहरात सुरू आहेत. देवा भाऊ लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन केसाने गळा कापत आहे. त्यामुळे तो देवा भाऊ नसून मेवा भाऊ आहेत.’’

इतिहास, नावे पुसणे हाच भाजपचा विचार

पुणे शहर हे विचारांचे शहर आहे. मात्र इतिहास, नावे पुसून टाकणे हा भाजपचा विचार आहे. त्यांच्याच पक्षातील गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे नाव पुसून टाकण्याचे काम करण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने गेल्या १४ वर्षात एकही योजना सुरू करण्यात आली नाही. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष फोडून त्यांचेही नाव पुसले जात आहेत, असे सपकाळ म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.