ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
शबरीमला सोने चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने शुक्रवारी भगवान अयप्पा मंदिराचा मुख्य पुजारी कंदरारू राजीवला अटक केली आहे. एसआयटीने राजीवला अटक करत अज्ञात ठिकाणी चौकशीसाठी नेले होते, ज्यानंतर एसआयटीने त्याला कार्यालयात आणत औपचारिक अटकेची कारवाई नोंदविली आहे. तर दुसरीकडे ईडीने केरळच्या शबरीमला सोने चोरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी आणि त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे माजी अध्यक्ष पद्मकुमार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राजीवला अटक करण्यात आली आहे. राजीवचे पोट्टीसोबत घनिष्ठ संबंध होते आणि त्यांनी मंदिराच्या द्वारपालकाच्या (रक्षकदेवता) प्लेट तसेच श्रीकोवलच्या (गर्भगृह) द्वार-फ्रेमच्या री-प्लेटिंगची शिफारस केली होती.
त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने री-प्लेटिंगसाठी त्यांची अनुमती मागितली असता राजीवने याला मंजुरी दिली होती. एसआयटी अधिकाऱ्यांनुसार याप्रकरणी राजीवची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. केरळ उच्च न्यायालयाकडून या सोने चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्यावर करण्यात आलेली ही 11 वी अटक आहे.