खुटबाव, ता. ७ : पारगाव (ता. दौंड) येथे लोकसहभागातून स्वर्गीय आमदार राजारामबापू ताकवणे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प पारगाव ग्रामस्थांनी ताकवणे यांच्या २६व्या स्मृतिदिनानिमित्त केला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात १०३ बाटल्या रक्त संकलित झाले. तसेच, ४५ ग्रामस्थांची नेत्र तपासणी झाली. त्यापैकी चार ग्रामस्थांना डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे नेण्यात आले.
याबाबत सरपंच सुभाष बोत्रे म्हणाले, ‘‘स्वर्गीय राजारामबापू ताकवणे हे पारगावची अस्मिता आहेत. त्यांच्या योगदानामुळे पारगावची ओळख जिल्हाभर झाली. त्यामुळे पारगाव ग्रामस्थांनी ताकवणे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुतळ्यासाठी लागणारी जागा ग्रामपंचायत पारगावच्या वतीने उपलब्ध केली जाईल.’’
या पुतळ्यासाठी माजी सरपंच सर्जेराव जेधे व ग्रामस्थ तुकाराम शितोळे यांच्या वतीने प्रत्येकी एक लाख, सरपंच सुभाष बोत्रे व सयाजी ताकवणे यांच्या वतीने प्रत्येकी ५१ हजार रुपये देणगी जाहीर करण्यात आली. तानाजी दिवेकर, सयाजी ताकवणे, सर्जेराव जेधे, राजाराम कदम, नामदेव ताकवणे, राम गाडेकर, विष्णू खराडे, संभाजी ताकवणे, रमेश बोत्रे, राजेंद्र शिशुपाल, महेश ताकवले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माउली ताकवणे, भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे, बाजार समितीचे संचालक अतुल ताकवणे, पारगाव सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र ताकवणे, भीमा संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र बोत्रे, सुरेश ताकवणे, सोमनाथ ताकवणे, रामकृष्ण ताकवणे आदी उपस्थित होते.