NMMC Election: गणेश नाईक पार्टीविरोधात शिवसेनेची लढाई, जाहीरनामा प्रकाशनावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?
esakal January 11, 2026 05:45 AM

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा ‘काळ्या दगडावरची भगवी रेघ - नवी मुंबई नवं सरकार’ हा जाहीरनामा खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी त्यांनी थेट गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करीत शिवसेनेची लढाई भाजपशी नसून ‘जीएनपी’ म्हणजेच गणेश नाईक यांच्या राजकारणाविरोधात आहे.

निवडणूकप्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या सिडको भूखंड, पाणीचोरी आणि पालिकेच्या तिजोरीच्या कथित लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, त्यांनी मागील २५ वर्षांत सिडको निर्मित माथाडी कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मूलभूत सुविधा न पुरवल्याचा आरोप केला. ‘दरोडेखोरांनी दुसऱ्याला चोर म्हणू नये. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये,’ अशा शब्दांत टीका केली.

Municipal Election Voting: मतदान प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहण्याची अंतिम संधी, अन्यथा शिस्तभंगात्मक कारवाई अटळ

पालिकेच्या फिक्स डिपॉझिटचा वापर नागरिकांच्या आरोग्य, नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी व्हायला हवा होता, मात्र तसे झाले नाही, असाही दावा करीत त्यांनी नवी मुंबईकरांना केवळ आरोपांची नव्हे तर प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

एकीकडे नवी मुंबईच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यावरण आणि डिजिटल प्रशासनावर केंद्रित ठोस जाहीरनामा, तर दुसरीकडे तीव्र राजकीय आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर येणारी नवी मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा विश्वास मिळवेल, असा आत्मविश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात MOFA आणि RERA चे वेगळे नियम; सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा, नवे नियम काय?

याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते विजय नहटा यांनी नाईकांच्या मुलांवर नाव न घेता खंडणी वसुलीचे आरोप केले. नवी मुंबईत बावखळेश्वरसारखी जागा कोणी लाटली, असा सवाल नाहटा यांनी उपस्थित केला. गेले अनेक दिवस नवी मुंबईचा पुनर्विकास रोखून धरला. इमारतींना ओसीदेखील दिली जात नाही याला जबाबदार कोण, असा प्रश्न जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी उपस्थित केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.