IND vs NED : एकूण 4 सामन्यांसाठी संघ जाहीर, भारत-नेदरलँड्स सामना कधी?
Tv9 Marathi January 13, 2026 09:45 AM

आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. या 10 व्या टी 20i र्वल्ड कप स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 8 मार्चला अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. भारत आणि श्रीलंककडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेसाठी सोमवारी 12 जानेवारीला आणखी एका संघाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नेदरलँड्स क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.

नेदरलँड्सचा कॅप्टन कोण?

नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. स्कॉट एडवर्ड्स नेदरलँड्सचं नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेतील सहभागी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार नेदरलँड्स ए ग्रुपमध्ये आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार नेदरलँड्स आपल्या ग्रुपमधील प्रत्येक संघाविरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे. नेदरलँड्स व्यतिरिक्त ए ग्रुपमध्ये यजमान टीम इंडिया, पाकिस्तान, नामिबिया आणि अमेरिकाचा समावेश आहे.

नेदरलँड्सचा पहिला सामना केव्हा?

नामिबिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 मोहिमेतील आपला पहिला सामना 7 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. नेदरलँड्सने युरोप क्वालिफायर स्पर्धेतून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. युरोप क्वालिफायरमध्ये नेदरलँड्स व्यतिरिक्त इटलीनेही वर्ल्ड कप स्पर्धेत धडक दिलीय. इटलीची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे.

नेदरलँड्स वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज

A host of experienced campaigners in the mix as the Netherlands announce their #T20WorldCup squad 📋https://t.co/NlpMDA08sc

— ICC (@ICC)

नेदरलँड्सचा सातवा टी 20i वर्ल्ड कप

नेदरलँड्सची यंदाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची एकूण सातवी वेळ आहे. नेदरलँड्स 2009 साली पहिल्यांदा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाली होती. नेदरलँड्सने तेव्हा स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडला लोळवलं होतं. तसेच नेदरलँड्सने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि इतर संघांना पराभूत केलंय. त्यामुळे नेदरलँड्स यंदा कुणाचा टांगा पलटी करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

नेदरलँड्सचं वेळापत्रक

7 फेब्रुवारी, विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो

10 फेब्रुवारी, विरुद्ध नामिबिया, दिल्ली

13 फेब्रुवारी, विरुद्ध यूएसए, चेन्नई

18 फेब्रुवारी, विरुद्ध भारत, अहमदाबाद

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी नेदरलँड्स टीम : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन ॲकरमन, नोआ क्रोएस, बास डी लीडे, आर्यन दत्त, फ्रेड क्लासेन, काइल क्लाइन, मायकेल लेविट, झॅक लायन-कॅशेट, मॅक्स ओ’डोड, लोगान व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुगटेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकरेन आणि साकिब झुल्फिकार.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.