तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी निर्माण झाला तांत्रिक दोष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्रोचे महत्त्वाकांक्षी ‘पीएसएलव्ही-सी 62’ अग्नीबाण प्रक्षेपण अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे या प्रक्षेपणाच्या माध्यमातून अवकाशात सोडले गेलेले 16 उपग्रह भरकटले आहेत. या प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात अंतिम क्षणी निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे हे संपूर्ण प्रक्षेपणच फसल्याची घोषणा इस्रोकडून करण्यात आली. सोमवारी सकाळी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून या अग्नीबाणाने पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार सुरळीतपणे अंतराळात झेप घेतली होती. हे अभियान चार टप्प्यांचे होते. तथापि, प्रक्षेपणानतंर 8 मिनिटांमध्येच मोठा तांत्रिक दोष निर्माण झाला होता.
प्रक्षेपणाचे प्रारंभीचे दोन टप्पे अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडले. मात्र, तिसऱ्या टप्प्यात प्रक्षेपणासाठी आवश्यक ते बळ निर्माण होऊ शकले नाही. इंधन दाब कमी पडल्याने आवश्यक त्या वेगाने अग्नीबाण आणखी पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे या अग्नीबाणाला त्याचा पूर्वनिर्धारित प्रक्षेपण मार्ग राखता आला नाही. साहजिकच या अग्नीबाणावरील उपग्रहांना इच्छित कक्षांमध्ये प्रस्थापित करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो आहोत, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पत्रकारांना दिली.
अपयशाने खचून जाऊ नका…
कोणत्याही अवकाश संशोधन कार्यक्रमात अपयश येणे अशक्य नसते. तो या प्रक्रियेचाच भाग असतो. तथापि, अशा अपयशांनी खचून न जाता, किती वेगाने तुम्ही त्यातून बाहेर पडून नव्या जोमाने कामाला लागता, यावर तुमचे पुढचे यश अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया इस्रोचे शास्त्रज्ञ आणि सौर पॅनेल तज्ञ महेश पुरोहित यांनी व्यक्त केली आहे. या अपयशाच्या कारणांचे विश्लेषण केले जाईल आणि पुढच्या अभियानांमध्ये चुका सुधारल्या जातील, असेही इस्रोने स्पष्ट केले.
देशाच्या संरक्षण कार्यक्रमाला धक्का
या अग्नीबाणावर एकंदर 16 उपग्रह होते. त्यांच्यात ‘अन्वेषा’ हा भारतनिर्मित उपग्रह सर्वात मोठा होता. तसेच 15 अन्य मध्यम आणि छोटे उपग्रहही होते. ‘अन्वेषा’ हा भारताचा संरक्षण उपग्रह होता. सहाशे किलोमीटर अंतरावरुन पृथ्वीवर कोणत्याही झुडुपात लपून बसलेला शत्रू शोधण्याची त्याची क्षमता होती. हा उपग्रहृ तसेच अन्य 15 उपग्रह आता ‘हरविले’ असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारताच्या संरक्षण कार्यक्रमाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. अन्वेषाप्रमाणेच डीआरडीओचा ‘आयुआयसॅट’ हा महत्त्वाकांक्षी उपग्रहही हातचा गेला आहे. अवकाशात सोडलेल्या इतर उपग्रहांना ‘इंधन’ पुरविण्याची त्याची क्षमता होती. या अपयशामुळे हे कार्यक्रम आता नव्याने हाती घ्यावे लागणार आहेत. ‘अन्वेषा’ आणि ‘आयुआयसॅट’ हे दोन्ही उपग्रह काही काळानंतर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील आणि जळून जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
सलग दुसरे अपयश
पीएसएलव्ही या अग्नीबाणाचे हे सलग दुसरे अपयश आहे. मे 2025 मध्ये ‘पीएसएलव्ही-सी 61’ हा अग्नीबाणही तिसऱ्या टप्प्यातच अपयशी ठरला होता. अग्नीबाण इंजिनमध्ये पुरेसा दाब न निर्माण झाल्याने त्याला आवश्यक ती उंची गाठण्यात अपयश येऊन त्याची दिशा भरकटली होती. या सलग दोन अपयशांमुळे इस्रोच्या पुढच्या कार्यक्रमांवर विपरीत परिणाम होणार नाही, असा आत्मविश्वास या संस्थेकडून व्यक्त करण्यात आला असून झालेल्या चुकांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जाईल आणि तंत्रज्ञान पुनर्विकसित केले जाईल, असे प्रतिपादन करण्यात येत आहे.
जोमाने कामाला लागणार…
सलग दुसऱ्या अपयशानंतरही आम्ही धीर सोडला नसून नव्या जोमाने पुढील कार्यक्रम हाती घेऊ. तिसऱ्या टप्प्यात नेमके कोणते दोष निर्माण होतात आणि ते कसे दूर केले जाऊ शकतात, यावर अत्यंत गंभीरपणे विचार केला जाईल. मात्र, या अपयशामुळे इस्रोच्या 2026 च्या वेळापत्रकावर परिणाम होणे शक्य आहे.
अपयशामुळे मोठा धक्का
ड पीएसएलव्हीच्या सलग दुसऱ्या अपयशामुळे इस्रोला मोठा धक्का
नवेशा, आयलुसेट किंवा सॅटेलची एकसमान शक्ती
ड तिसऱ्या टप्प्यातील तांत्रिक दोषांचा इस्रो गांभीर्याने अभ्यास करणार
ड या अपयशामुळे इस्रोच्या 2026 च्या वेळापत्रकावर परिणाम शक्य