rat11p5.jpg
16886
संगमेश्वर ः मातीला आकार देत सुगडांची निर्मिती करताना कारागिर.
संक्रांतीच्या सणात मातीच्या वाणांचा गोडवा
देवरुखमध्ये व्यावसायिकांची मेहनत ; पर्यावरणपूरक वाणांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ : मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात सणाची लगबग सुरू झाली आहे. या सणाच्या गोडव्यात भर घालणाऱ्या पारंपरिक मातीच्या वाणांच्या निर्मितीसाठी कुंभार समाजातील कारागीर सध्या विशेष मेहनत घेत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील कुंभार वाड्यात संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर लाल मातीपासून सुगडे तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. शेकडो सुगड, माठ व इतर मातीची भांडी घडवण्यात कलाकार मग्न झाले आहेत. सध्या नेहमीच्या माठनिर्मितीपेक्षा संक्रांतीसाठी लागणाऱ्या सुगड निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे.
ग्रामीण भागात आजही मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनी एकमेकींना मातीची वाण देण्याची प्राचीन परंपरा जपली जाते. प्लास्टिक व आधुनिक साहित्याचा वापर वाढला असला तरी पर्यावरणपूरक आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मातीच्या वाणांना अजूनही विशेष मागणी आहे. कुंभारांच्या हातून साकारलेली ही वाण केवळ वस्तू नसून परंपरा, निसर्गाशी असलेली नाळ आणि सांस्कृतिक ओळख जपणारी ठरते. दिवाळीनंतर वर्षातील मकरसंक्रांत हा एकमेव सण कुंभार समाजाच्या जीवनात काही प्रमाणात आर्थिक दिलासा देणारा ठरतो. मात्र बदलत्या काळात कुंभार व्यवसायासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
माती, लाकूड व इंधन यांचे दर दिवसेंदिवस वाढत असून उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत मातीच्या वाणांची मागणी काहीशी घटली आहे. तसेच शिक्षण व अन्य रोजगाराच्या संधींमुळे तरुण पिढी या पारंपरिक व्यवसायापासून दूर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यात ही परंपरा टिकवणे आव्हानात्मक ठरेल, अशी चिंता कुंभार कारागिरांकडून व्यक्त केली जात आहे.
चौकट
तिळाच्या दरात वाढ
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर यंदा तिळाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. अपेक्षित पाऊस व पोषक वातावरण न मिळाल्याने तिळाचे उत्पादन घटले असून बाजारात तिळाची आवक मर्यादित आहे. परिणामी तिळाचे दर सरासरी १५० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. काही ठिकाणी याहून अधिक दरानेही तिळाची विक्री होत आहे. शहरी व ग्रामीण बाजारपेठांमध्ये रेडिमेड तिळगुळालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.