भारताच्या अध्यक्षतेत समुहाचा वाढणार दबदबा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या अध्यक्षतेत चालू वर्षी ब्रिक्सचा मंच ‘कमळा’ने सजणार आहे. विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी ब्रिक्स 2026 साठी अधिकृत लोगो आणि वेबसाइट लाँच केली आहे. या लोगोमध्ये असलेले कमळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भारताच्या अध्यक्षतेदरम्यान ब्रिक्स समुहाद्वारे जागतिक कल्याणाला पुढे नेण्यावर जोर दिला जाईल, समुह स्वत:चा 20 वे स्थापनावर्ष साजरे करत असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
ब्रिक्स 2026 ची थीम क्षमतावृद्धी, नवोन्मेषाला चालना आणि सर्वांच्या लाभासाठी निरंतर विकास सुनिश्चित करणे आहे. आज लाँच करण्यात आलेला लोगो हाच विचार दर्शविणारा असून हा परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ आहे. लोगोच्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्स सदस्य देशांचे रंग सामील असून ते एकता, विविधत आणि संयुक्त उद्देशाची भावना दर्शवितात असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
जगातील 5 मोठ्या अर्थव्यवस्था ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स समुहाचे नेतृत्व करतात. हा समूह 2006 साली स्थापन झाला होता. मागील काही वर्षांमध्sय समुहाचा वेगाने विस्तार झाला असून इजिप्त, इथियोपिया, इराण, संयुक्त अरब अमिरात आणि इंडोनेशिया हे देश पूर्ण सदस्य म्हणून ब्रिक्समध्ये सामील झाले आहेत.
लोगोचे स्वरूप
अधिकाऱ्यांनुसार नव्या लोगोची प्रेरणा कमळातून घेण्यात आली आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा आणि मजबुतीचे प्रतीक असलेला हा लोगो आहे. लोगोच्या पाकळ्यामध्ये ब्रिक्स देशांचे रंग दाखविण्यात आले असून ते वेगवेगळ्या आवाजांना एका संयुक्त उद्देशासोबत जोडण्याचा संदेश देतात. तर लोगोदरम्यान नमस्काराचे चिन्ह असून जे सन्मान आणि सहकार्याची भावना दर्शविते. याचबरोबर ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि निरंतर विकासासाठी निर्माण’ या आशयाची टॅगलाइनही ठेवण्यात आली आहे.
वेबसाइटही सादर
जयशंकर यांनी यावेळी ब्रिक्सची नवी वेबसाइटही लाँच केली आहे. याचा उद्देश ब्रिक्सशी निगडित सर्व माहितींसाठी एक मध्यवर्ती व्यासपीठ तयार करणे आहे. यात ब्रिक्सचे पुढाकार, प्रकल्प, कार्यक्रम आणि अधिकृत दस्तऐवजांची माहिती उपलब्ध असेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
बँकेला आणखी मजबूत करू
ब्रिक्सला एक सुधारित बहुपक्षीय व्यवस्थेसाठी प्रतिबद्ध होण्याची गरज आहे. अशा व्यवस्थेत संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक व्यापार संघटना, आयएमएफ आणि जागतिक बँक यासारख्या संस्था अधिक प्रतिनिधी अणि समावेशक असाव्यात. ब्रिक्स देशांकडून स्थापन न्यू डेव्हलपमेंट बँक आर्थिक सहकार्याचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरले आहे. हे सदस्य देशांच्या पायाभूत विकास आणि निरंतर विकासाला चालना देत आहे .भारत या बँकेला आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे समर्थन करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. लोकांदरम्यान आदान-प्रदान नेहमीच ब्रिक्सचा एक महत्त्वाचा हिस्सा राहिले आहे. यात युवा, संस्कृती, शिक्षण, क्रीडा, पर्यटन आणि अकॅडमिक चर्चेवर विशेष जोर देण्यात येईल. हे आदान-प्रदान परस्पर समज तयार करणे आणि सहकार्य दृढ करण्यास मदत करेल. यामुळे ब्रिक्समध्ये समुदायाची भावना मजबूत होत दीर्घकालीन सहकार्याचा पाया रचला जाईल असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
ब्रिक्सबद्दल अमेरिका अस्वस्थ
स्थापनेपासूनच ब्रिक्स हे एक महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. सध्या यात एकूण 11 सदस्य देश सामील असून जे जगातील सुमारे 49.5 टक्के लोकसंख्या, जवळपास 40 टक्के जागतिक जीडीपी आणि सुमारे 26 टक्के जागतिक व्यापाराचे प्रतिनिधित्व करतात. तर भारताच्या 2026 च्या अध्यक्षतेत ब्रिक्सकडून जागतिक स्तरावर सहकार्य आणि प्रभाव आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. समुहाने वेळोवेळी अमेरिकेच्या डॉलर्सच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याने अमेरिकेचा तिळपापड होत आहे.