Government Employee Cheating Case : जीएसटी कार्यालयातील जप्त मशिनरी स्क्रॅपचे टेंडर मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जीएसटी ऑफिसमधील शिपाई रसूल बाबू शेख (वय ५२, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत स्क्रॅप व्यावसायिक तौफिक मकसूद खान (वय ४१, रा. इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी रसूल शेख याने स्वतःला जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून एका डेअरीची जप्त मशिनरी स्क्रॅप टेंडरद्वारे विक्रीस काढली जाणार असल्याचे सांगितले. या टेंडरमधून मोठा आर्थिक फायदा होईल, असा विश्वास संपादन करून त्याने खान यांच्याकडून पैसे उकळले.
फेब्रुवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शेख याने विविध कारणे सांगून खान याच्याकडून आरटीजीएस व एनईएफटीद्वारे एकूण ४५ लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले, मात्र दीर्घकाळ उलटूनही कोणतेही टेंडर मिळाले नसल्यामुळे यानंतर खान यांनी जीएसटी कार्यालयात चौकशी केली असता शेख हा केवळ शिपाई असल्याचे व यापूर्वीही अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली.
Kolhapur Election : महापालिकेच्या सत्तेसाठी पैशांचा खेळ रंगात; ‘लक्ष्मीदर्शन’ किती रुपयांचे, यावरच मतांची मोजदाद!पैसे परत मागितल्यावर शेख याने उडवाउडवीची उत्तरे देत धमकावण्याचा प्रयत्न केला. अखेर फसवणुकीची खात्री झाल्यानंतर शनिवारी (ता. १०) रात्री शिवाजीनगर पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज अटक करून येथील न्यायालयात हजर केले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव करत आहेत. पुढील तपासात आणखी फसवणुकीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिस देणार जीएसटी विभागाला पत्र
शेख हा जीएसटी विभाग, कोल्हापूरयेथे शिपाई म्हणून कार्यरत असून, सरकारी कार्यालयाचा गैरवापर करत एका डेअरीच्या मशिनरी स्क्रॅप टेंडरचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांकडून जीएसटी विभागाला लेखी पत्र दिले जाणार आहे. त्यानंतर ४५ लाख रुपयांच्या रकमेचा नेमका वापर, जीएसटी विभागातील इतर कर्मचाऱ्यांचे संगनमत आहे का, याची सखोल चौकशी केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.