अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत या पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष, जापानी गोलंदाजाची रंगली चर्चा
GH News January 15, 2026 01:12 AM

U19 World Cup 2026: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. कारण सर्वच नवखे चेहरे आहेत. त्यापैकी कोण कसं खेळतं याचा अंदाज नाही. वैभव सूर्यवंशी आणि समीर मिन्हासबाबत त्यातल्या त्यात काहीतरी माहिती आहे. पण इतर खेळाडूंबाबत फार काही कल्पना नाही. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 2025 हे वर्ष गाजवलं आहे. त्याच्या नेतृत्वात अंडर 19 दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकाही भारताने 3-0 ने जिंकली. दुसरीकडे, पाकिस्तानचा ओपनर समीर मिन्हास अंडर 19 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत त्याने भारताविरुद्ध 172 धावांची खेळी केली होती. तसेच मलेशियाविरुद्धही 177 धावा केल्या होत्या. त्याच्यामुळे पाकिस्तानचा संघ मजबूत स्थिती आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऑलिवर पीक

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऑलिवर पीकचं नावही चर्चेत आहे. मागच्या पर्वात जेतेपद मिळवणाऱ्या संघाचा भाग होता. एक खेळाडू जखमी झाल्यानंतर त्याला रिप्लेसमेंट संधी मिळाली होती. आता कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. ऑलिवरने देशांतर्गत क्रिकेट आणि बिग बॅश लीग स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. मेलबर्न रेनेगेड्सला शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला होता. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया जेतेपद राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

वेगवान गोलंदाज अली रजा

पाकिस्तानच्या ताफ्यात आणखी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. अली रजा त्याच्या उंची आणि गोलंदाजीच्या वेगामुळे चर्चेत आहे. मागच्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत पेशावर जल्मीसठी खेळताना 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध 4 विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानसाठी मॅच विनर खेळाडू होऊ शकतो.

जापानचा फिरकीपटू चार्ली हारा हिंजे

जापानचा अष्टपैलू खेळाडू चार्ली हारा हिंजेही या शर्यतीत आहे. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तो जापानच्या वरिष्ठ संघातही खेळतो. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या एका अंडर 17 सामन्यात त्याने 99 धावा केल्या होत्या. इतकंच काय तर 4 धावा देत 6 गडी बाद केले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.