Vastu Shastra : घरात पक्ष्यांनी अंडी देणं शुभ की अशुभ? काय असतात संकेत?
Tv9 Marathi January 16, 2026 03:45 AM

वास्तुशास्त्रानुसार घरात विशिष्ट पक्ष्यांनी अंडी घालणं हा एक शुभ संकेत आहे. जसे की जर कबुतराने तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला घरटं करून अंडी घातली तर तुमच्या घरात लवकरच बरकत येईल, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील, पैशांची बचत होईल आणि तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश मिळेल असा त्याचा अर्थ मानला जातो. त्याचप्रमाणे कबुतरच नाही तर इतर पक्ष्यांनीही जरी तुमच्या घरात घरटे बांधून जर अंडी घातली असतील तरी देखील तो एक शुभ संकेत मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही जिथे राहता तिथे पक्ष्यांनी आपलं घरटं तयार केलं तर लवकरच तुमच्या स्वत:च्या घराचं स्वप्न देखील पूर्ण होईल असा त्यातून संकेत मिळत असतो. जर तुमच्या घरात चिमणीने अंडी दिले तर ते देखील घरात आर्थिक बरकतीचे संकेत असतात.

मात्र यामध्येच दुसरा विचारप्रवाह असा देखील आहे, की त्यांच्यामध्ये घरात पक्ष्यांनी अंडे घालणं हे एक अशुभ संकेत मानले जातात. त्यामुळे घरात गृहकलह वाढतो, आर्थिक अडचणी येतात, घरात बरकत राहत नाही. सामान्यपणे जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला पक्ष्यांनी अंडी घातले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात बरक येते, आर्थिक स्थिरता प्राप्त होते, लवकरच एखादी आनंदाची बातमी मिळेल याचे ते संकेत असतात.

विज्ञान काय सांगतं?

काही पक्षी हे वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार शुभ मानण्यात आले आहेत, मात्र विज्ञानाच्या दृष्टीने त्यांचं उपद्रव मूल्यच अधिक आहे, जसं की कबुतर, जर तुमच्या घराच्या आसपास मोठ्या संख्येनं कबुतर असतील तर तुमचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक असते, कारण कबुतरामुळे श्वसनाशी संबंधित व इतर काही गंभीर आजार होऊ शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.