वाशी, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार (ता. १६) मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. शहरातील राजकीय वातावरणात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका प्रशासनाने मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून, नवी मुंबईतील आठ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
शहरात आज गुरुवारी (ता. १५) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान संपल्यानंतर त्याच ठिकाणी मतदान यंत्रे व साहित्य जमा करण्यात आले होते. संबंधित सर्व केंद्रांवरील स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँग रूम परिसरात सीसीटीव्ही, प्रवेश निर्बंध आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी पालिका प्रशासनाने स्वतंत्र मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक तसेच सुरक्षा यंत्रणा नियुक्त केल्या आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर नियमांनुसार टेबल मांडणी, उमेदवारांचे प्रतिनिधी बसण्याची व्यवस्था, तसेच मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.
कडेकोट पोलिस बंदोबस्त
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व केंद्रांच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक निकालांची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मतमोजणीतून नवी मुंबईच्या आगामी कारभाराची दिशा स्पष्ट होणार असून, महापालिकेतील सत्तासमीकरण कोणाच्या बाजूने झुकते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
शहरातील विविध प्रभागांची मतमोजणी
ठिकाण प्रभाग क्रमांक
माता व बाल रुग्णालय (दिघा) १, २ आणि ३
सरस्वती विद्यालयात (ऐरोली से. ५) ४, ५ आणि ७
समाजमंदिर हॉल (घणसोली से. ७) ६, ८ आणि ९
अण्णासाहेब पाटील सभागृह (कोपरखैरणे से. ५) १०, ११, १२, १३
लोकशाहीर साठे समाजमंदिर (सानपाडा से. १०) १४, १५, १९, २०
जलतरण तलाव संकूल (वाशी से. १२) १६, १७ आणि १८
आगरी कोळी भवन (नेरूळ से. २४) २१, २२, २३ आणि २४
बेलापूर भवन (सीबीडी बेलापूर से. ११) २५, २६, २७ आणि २८