मालवणात रविवारी
सिनेमा करिअरचे धडे
मालवणः चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि सिने- कथा-कीर्तन (कुर्ला टू वेंगुर्ला) यांच्यावतीने एकदिवसीय ''सिनेमा करिअर'' कार्यशाळेचे आयोजन रविवारी (ता. १८) सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेत चित्रपटसृष्टीतील विविध संधी, अभिनय, दिग्दर्शन, लेखन, तंत्रज्ञान, ऑडिशन प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष अनुभवांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत राष्ट्रीय व राज्यस्तरीय नामांकित तज्ज्ञ सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत १८ ते ३० वयोगटातील स्त्री व पुरुष सहभागी होऊ शकतात. प्रथम येणार्या ५० जणांना प्रवेश दिला जाईल. सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय आचरेकर, वैभव यांच्याशी संपर्क साधावा.
.......................
कोळंबला मंगळवारी
धार्मिक कार्यक्रम
मालवण ः कोळंब येथील श्री महापुरुष पार येथे मंगळवारी (ता. २०) ब्राह्मण भोजन तसेच श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता लघुरुद्राने होणार असून दुपारी १२.३० वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता हळदीकुंकू, दुपारी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. सायंकाळी ६ पासून तीर्थप्रसाद आणि ७ नंतर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
.......................
ओरोस येथे आज
त्रैवार्षिक गोंधळ
ओरोस ः ओरोस-गावडेवाडी येथील देवी भवानी मंदिरात उद्या (ता. १६) भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव होणार आहे. कुलस्वामिनी भवानी देवी उत्सव मंडळामार्फत या गोंधळोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता देवीची पूजा, ९ वाजता संबळ पूजा, दुपारी १२ नंतर नवस फेडणे व बोलणे, सायंकाळी ५ वाजता जोगवा मागणे, ७ वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता मांड व ओटी भरणे, ११ वाजता गोंधळाला सुरुवात व पहाटे ५ वाजता दिवटी विसर्जन करून गोंधळाची सांगता होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन ओरोस-गावडेवाडी येथील ग्रामस्थ व कुलस्वामिनी भवानी देवी उत्सव मंडळाने केले आहे.
.....................
शिष्यवृत्ती परीक्षेचे
ओरोसमध्ये मार्गदर्शन
ओरोस ः विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन वर्ग घेत येथील रवळनाथ नवनगर रहिवासी संघाने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे. जिल्हाभरातील चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. संघाची स्थापना झाल्यापासून संघाने विविध सामाजिक व शैक्षणिक कामकाजात पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये होणार्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याची बाब निदर्शनास आल्याने या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेगवेगळ्या दिवशी मोफत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त शिक्षिका मीनल सावंत, प्राथमिक शिक्षक हरिश्चंद्र कालेलकर व श्रीमती साठे यांनी मार्गदर्शन केले. सातवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक निखिल शिंदे, बॅ. नाथ पै सेवांगणचे मनोज काळसेकर यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात रहिवासी संघ यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष मिलिंद सावंत, सचिव शरद पाटयेकर, जे. एम. गावित, काशिराम नाईक आदींनी स्पष्ट केले.
......................