मतदान केंद्रात घोणस आढळल्याने खळबळ
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) : चेंबूर येथील आर.सी.एफ. कॉलनीतील लॉरेटो कॉन्व्हेंट शाळेतील मतदान केंद्रात बुधवारी (ता. १४) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सुमारे चार फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे मतदान केंद्रावरील अधिकारी, सुरक्षा रक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्र अधिकारी राजेश मते यांनी तातडीने सर्पमित्र सुनील कदम यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र अभिरूप कदम, मानव अभ्यास संघ तसेच महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशनच्या प्राणीमित्रांनी घटनास्थळी दाखल होत मोठ्या शिताफीने त्या विषारी सापाला सुरक्षितपणे पकडले. पकडण्यात आलेल्या सापाला ठाणे वन विभागाचे अधिकारी जनार्दन बोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळला. एम-पूर्व व एम-पश्चिम विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रियांका पाटील यांनी सर्पमित्र अभिरूप कदम यांच्या कार्यतत्परतेबद्दल आभार व्यक्त केले. त्यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे आगामी मतदानाच्या दिवशी होऊ शकणारी दुर्घटना टळल्याचे सर्पमित्र सुनील कदम यांनी सांगितले.