हिर्डोशी, ता. १५ : आंबवडे (ता. भोर) खोऱ्यातील नाटंबी व चिखलावडे खुर्द गावात सायबेज आशा संस्थेकडून करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांसाठींच्या कामांचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका रितू नथानी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १३) करण्यात आले. यावेळी नथानी यांचे दोन्ही गावातून वाजतगाजत जोरदार स्वागत करताना महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सायबेज संस्थेकडून दत्तक घेतलेल्या गावात पायाभूत सुविधा व उपजीविका विकास प्रकल्पांतर्गत विविध कामे केली जात आहेत. यातूनच चिखलवाडे खुर्द येथे १०० मीटर अंतर्गत काँक्रिट रस्ता, १९० मीटर भूमिगत गटार, तर नाटंबी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी शौचालय, २२५ मीटर भूमिगत गटार वाहिनीचे काम पूर्ण केले आहे. या पायाभूत सुविधांमुळे शाळेतील विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांच्या आरोग्य व स्वच्छतेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. तसेच, सायबेजच्या कृषी उपक्रमांद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञान व वर्षभर फेरपालट पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत असल्यामुळे उत्पादन क्षमता वाढण्यास आणि शाश्वत उपजीविकेला चालना मिळत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
02994